Rohini Acharya On Tej Pratap Yadav Expels from RJD : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी त्यांचे पुत्र तथा माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची आज पक्षातून हकालपट्टी केली. तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर कुटुंबातून देखील त्यांना बेदखल करण्यात आल्याचं लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं आहे. तेज प्रताप यादव यांच्यावर कारवाई करण्यामागचं कारण देखील लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, तेज प्रताप यादव यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी अनुष्का यादव नावाच्या महिलेशी त्यांचे प्रेमसंबंध असून १२ वर्षांपासून ते दोघे एकत्र असल्याची माहिती दिली होती. ही गोष्ट आपण सर्वांसमोर उघड करत आहोत, असंही त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं होतं. मात्र, यानंतर काही तासांनी तेज प्रताप यादव यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि आपलं फेसबुक हॅक झाल्याचा दावा केला. पण यावरूनच लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगितलं.
तेज प्रताप यादव यांच्यावरील कारवाईवर तेजस्वी यादव यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या रोहिणी आचार्य यांनी त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांच्या निर्णयाचं समर्थन केलं. रोहिणी आचार्य यांनी म्हटलं की, “जे लोक परंपरा, कुटुंब आणि प्रतिष्ठेची काळजी घेतात त्यांना कधीही प्रश्न विचारला जात नाही. जे लोक आपल्या विवेकाचा त्याग करतात आणि सभ्य वर्तन आणि कौटुंबिक प्रतिष्ठेच्या मर्यादा ओलांडण्याची चूक वारंवार करतात, ते स्वतःच स्वतःला टीकेचा विषय बनवतात. आमच्यासाठी बाबा देवासारखे आहेत. कुटुंब हे आमचे मंदिर आणि अभिमान आहे आणि बाबांच्या अथक प्रयत्नांनी आणि संघर्षांनी उभारलेला पक्ष आणि सामाजिक न्यायाची संकल्पना ही आमची पूजा आहे. या तिघांची प्रतिष्ठा कोणामुळेही कलंकित झाली हे आम्ही कधीही स्वीकारणार नाही”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
जो परिवेश , परंपरा , परिवार और परवरिश की मर्यादा का ख्याल रखते हैं , उन पर कभी सवाल नहीं उठते हैं , जो अपना विवेक त्याग कर मर्यादित आचरण व् परिवार की प्रतिष्ठा की सीमा को बारम्बार लांघने की गलती – धृष्टता करते हैं, वो खुद को आलोचना का पात्र खुद ही बनाते हैं ..
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) May 25, 2025
हमारे लिए पापा… https://t.co/8ANl4AN718
तेजस्वी यादव यांनी काय प्रतिक्रिया दिली?
आपल्या मोठ्या भावावर वडिलांनी केलेल्या कारवाईवर लालू यादव यांचे धाकटे पुत्र व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्हाला हे सगळं योग्य वाटत नाही. हे सहन होण्यापलीकडचं आहे. हे प्रकरण माझ्या मोठ्या भावाशी संबंधित आहे. मात्र, ते प्रौढ आहेत, खासगी आयुष्यात काय निर्णय घ्यायला हवेत, काय नको ते ठरवण्याइतके मोठे ते नक्कीच आहेत. त्यांना त्याचा अधिकारही आहे. मात्र, आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घेतला आहे तो आता सार्वजनिक झाला आहे. बाकी मी त्यावर फार काही बोलू शकत नाही. माझे मोठे भाऊ त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात, त्याची कोणाला माहिती नसते. घरातली मंडळी देखील त्यांना प्रश्न विचारत नाही. मला देखील तुम्हा प्रसारमाध्यमांमुळे माहिती मिळाली आहे”, असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं.