Rohini Acharya Quits Politics Statement On X: बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी शनिवारी राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले. याचबरोबर त्यांनी कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडल्याचीही घोषणा केली.
रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.”
कोण आहेत रोहिणी आचार्य?
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांनी गेल्या वर्षी सारण येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना अपयश आले होते. त्यांना भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
बिहार निवडणुकीत काय घडले?
भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.
एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.
दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यांना केवळ ३५ जागांवर विजय मिळवता आला. महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दलाला केवळ २६ जागांवर विजय मिळाला. २०२० च्या निवडणुकीत ७५ जागांसह राष्ट्रीय जनता दल बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर गेल्या निवडणुकीत १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ ६ जागांवर यश मिळाले.
