Rohini Acharya On Yadav Family Split : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने तब्बल २०२ जागा जिंकत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवलं, तर या निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला. मात्र, बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला आलेल्या अपयशानंतर लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली असून त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.
रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहिणी आचार्य यांनी आज पुन्हा एकदा एक्सवर (ट्विटर) नवी पोस्ट शेअर करत पुन्हा गंभीर आरोप केलेत. ‘मला काल अपमानित केलं गेलं, शिव्या दिल्या गेल्या, मारण्यासाठी चप्पल उगारली गेली’, असं म्हणत ‘मला अनाथ बनवण्यात आलं’ असा आरोप रोहिणी आचार्य यांनी केला आहे.
रोहिणी आचार्य यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
“काल एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. मला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही. फक्त आणि फक्त यामुळे मला अपमान सहन करावा लागला. काल एका मुलीने तिच्या आईवडिलांना आणि बहिणींना असहाय्यतेनं सोडलं, मला माझं माहेरचं घर सोडावं लागलं, मला अनाथ बनवण्यात आलं. तुम्ही सर्वांनी कधीही माझ्या मार्गावर जाऊ नका. रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
रोहिणी आचार्य यांची आधीची पोस्ट काय होती?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रोहिणी आचार्य यांनी शनिवारी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.”
कोण आहेत रोहिणी आचार्य?
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांनी गेल्या वर्षी सारण येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना अपयश आले होते. त्यांना भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
बिहार निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.
