Russia’s Reply on White House Comment: रशियाकडून भारत कच्चे तेल आयात करत असल्यामुळे आणि युक्रेन युद्धात अप्रत्यक्ष मदत होत असल्यामुळे भारतावर टॅरिफ सारखे निर्बंद लादलण्यात आले. त्यामुळे रशियावर दबाव निर्माण झाला, असे विधान व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी केल्यानंतर आता त्याला रशियाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “अमेरिकेचे विधान अयोग्य असून कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता भारत आणि रशिया यांच्यातील ऊर्जा सहकार्य सुरू राहिल”, असे भारतातील रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या दाव्यावर दुटप्पीपणाची टीका करताना बाबुश्किन म्हणाले, “राष्ट्रीय हिताचा अनादर करून जे लोक इतरांवर निर्बंध लादत आहेत, त्याचा त्यांनाच फटका बसत आहे. रशियन कच्चे तेल विकत न घेण्याबाबत भारतावर टाकलेला दबाव अयोग्य आहे.”
तर भारताच्या वस्तू रशियात येऊ शकतात
बाबुश्किन पुढे म्हणाले, “रशिया भारताबरोबरच्या आपल्या धोरणात्मक भागीदारीला महत्त्व देतो आणि कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत भारताच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची खात्री देतो. जर भारतीय वस्तू अमेरिकेन बाजारपेठेत जाऊ शकत नसतील तर त्या रशियाकडे येऊ शकतात. भारत रशियासाठी खूप महत्त्वाचा आहे.”
रशियन दूतावासाने पुढे म्हटले की, रशियाच्या कच्च्या तेलावर भारताला पाच टक्के सूट दिली जात आहे. भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, त्यामुळे भारत हा पुरवठा बंद करण्याचा कोणताही प्रश्न येत नाही. रशियन कच्च्या तेलाला कोणताही पर्याय नाही.
ट्रम्प प्रशासनाने काय म्हटले होते?
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटले की, युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी आणि रशियावर दबाव टाकण्यासाठी भारतावर टॅरिफ सारखे निर्बंद लादले गेले. रशिया-युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रचंड दबाव निर्माण केला. त्यांनी भारतावर निर्बंध लादले आणि इतरही काही महत्त्वाची पावले उचलली.”
यापुढे जाऊन लेविट म्हणाल्या की, रशियावर आणखी दबाव वाढविण्यासाठी ट्रम्प यांनी दुय्यम कर लादण्याचीही तयारी केली होती.