Donald Trump On Volodymyr Zelenskyy : रशिया-युक्रेन संघर्षाला तब्बल दोन वर्षे उलटून गेली आहेत. पण अजूनही या दोन्ही देशातील संघर्ष थांबण्यास तयार नाही. रशिया सातत्याने युक्रेनच्या भूमीवर हल्ले करत आहे. गेल्या दोन वर्षांत लढाऊ विमानांपासून रणगाड्यांपर्यंत युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मध्यतरी युक्रेननेही रशियावर हल्ला करत जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यातच काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसत नाही.
एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी संवाद देखील साधला होता. मात्र, तरीही अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. असं असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी मोठं भाष्य करत रशियाला धमकीवजा इशाराच दिला आहे. पुढील ५० दिवसांत युक्रेनबरोबरील युद्धबंदी करण्यास रशियाने सहमती दर्शवली नाही तर रशियाविरुद्ध कठोर टॅरिफ लागू करण्यात येणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यातील चर्चेसंदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना खासगीरित्या रशियन हद्दीत हल्ले वाढवण्याचे आवाहन केल्याचं बोललं जात आहे. अगदी योग्य शस्त्रे दिली तर युक्रेन रशियाच्या मॉस्को व सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकेल का? असा थेट सवालच डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना विचारल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी ४ जुलै रोजी झालेल्या संभाषणा दरम्यान हे सवाल विचारल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या प्रश्नावर झेलेन्स्की यांनी उत्तर दिलं की, “अगदी. जर तुम्ही आम्हाला शस्त्रे दिली तर आम्ही करू शकतो.”
दरम्यान, ट्रम्प यांनी मध्यस्थी करूनही रशियाने योग्य तो प्रतिसाद न दिल्यानंतर आता ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील या चर्चेची आंतरराष्ट्रीय स्थरावर मोठी चर्चा रंगली आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष येत्या काळात आणखी वाढणार तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, या अहवालावर व्हाईट हाऊस किंवा युक्रेनियन राष्ट्रपती कार्यालयाने अधिकृतपणे अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.