वृत्तसंस्था, नवी दिल्ली
“भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल ज्यांना समस्या आहे, त्यांनी आमच्याकडून तेल खरेदी करणे बंद करावे,” अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अमेरिकेला फटकारले. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याबद्दल अमेरिकेने भारतीय मालावर अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लागू केले आहे. त्या निर्णयावर जयशंकर यांनी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात वरीलप्रमाणे टिप्पणी केली.
जयशंकर म्हणाले की, व्यवसायाभिमुख अमेरिकी प्रशासनासाठी काम करणारे लोक इतरांवर व्यवसाय करत असल्याचा आरोप करणे गमतीदार आहे. त्याचवेळी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू असून काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि लघु उत्पादकांच्या हितसंबंधांवर सरकार तडजोड करणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. यावर आम्ही ठाम आहोत, असे ते म्हणाले.
भारतावरील आयातशुल्कचा मुद्दा रशियाकडून तेल खरेदीशी जोडण्यास जयशंकर यांनी विरोध केला. या दोन्ही बाबींचा परस्परांशी काही संबंध आहे असे दाखवणे चूक आहे असे ते म्हणाले. रशियाकडून जास्त तेल घेणारे इतर देशही आहेत, रशिया-युरोप व्यापार हा भारत-रशिया व्यापारापेक्षा अधिक आहे असे त्यांनी लक्षात आणून दिले.
ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण पूर्वासूरींपेक्षा भिन्न
जगाशी संबंध राखण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरण आतापर्यंतच्या अमेरिकी अध्यक्षांपेक्षा एकदम भिन्न आहे, असे निरीक्षण जयशंकर यांनी नोंदवले. ट्रम्प आपले परराष्ट्र धोरण जसे जाहीरपणे राबवतात तसे आतापर्यंत कोणीही केले नव्हते. ते केवळ भारतापुरते मर्यादित नाही असेही जयशंकर म्हणाले.
जर तुम्हाला भारताकडून तेल किंवा शुद्धिकरण केलेली उत्पादने खरेदी करण्यात समस्या असेल तर, खरेदी करू नका. तुमच्यावर खरेदीसाठी कोणीही दबाव टाकत नाही. पण युरोप खरेदी करतो, अमेरिका खरेदी करते. त्यामुळे जर तुम्हाला आवडत नसेल तर खरेदी करू नका. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री