नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सणाचा उत्साह ओसंडून वाहात असतो. नवरात्रीचे नऊ दिवस दांडिया आणि गरबा खेळण्याची प्रथा अनेक भागांत अस्तित्वात आहे. ही प्रथा सर्वाधिक गुजरातमध्ये पाळली जाते. गरब्यामध्ये तरुणाईचा मोठा सहभाग दिसून येतो. पण गुजरातमध्ये अशी एक प्रथा आहे ज्यामुळे नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी पुरुष चक्क साड्या नेसून गरबा खेळतात. अशाच एका गरबा नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओच्या खाली दिलेल्या कॅप्शनवरून हा व्हिडीओ अमदावद या ठिकाणचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये पुरुष साड्या नेसून गरब्यात सहभागी झाल्याचं दिसत आहे. त्यांच्या आसपास असणाऱ्या स्त्रिया व काही इतर पुरुष त्यांचे व्हिडीओ शूट करत आहेत. ‘ऑसम अमदावद’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
काय आहे या प्रथेमागची दंतकथा?
गुजरात व आसपासच्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जातात. काही प्रचलित आख्यायिकांनुसार, २०० वर्षांपूर्वी साडूबेन नावाच्या एका महिलेसमोर मोठं संकट उभं राहिलं. एका मुघल व्यक्तीची वाईट नजर या महिलेवर पडली. आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी साडूबेन यांनी बारोत समुदायाच्या मंडळींकडे मदतीची याचना केली. मात्र, साडूबेनचं रक्षण करण्यात बारोत समुदायाला अपयश आलं. समोर आलेल्या संकटात साडूबेन यांच्या मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या साडूबेन यांनी बारोत समुदायाच्या पुरुषांना शाप दिला. या समुदायाच्या पुढच्या पिढ्या कधीही धैर्याने, हिमतीने जगू शकणार नाहीत, असं त्या म्हणाल्या. शिवाय, त्यांनी चितेवर आत्मदहन केल्याचंही सांगितलं जातं. त्यांच्याच शापातून मुक्तता मिळण्यासाठी पुरुष व्यक्ती साड्या नेसून गरबा खेळात सहभागी होतात.
साडू माता नी पोळ…
या प्रथेला स्थानिक आख्यायिकांनुसार ‘साडू माता नी पोळ’ असं म्हटलं जातं. नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी सर्व पुरूष तयार होऊन साडीच्या वेशात गरब्यात सहभागी होतात. या परंपरेला काही भागांमध्ये शेरी गरबा असंही म्हटलं जातं. जवळपास गेल्या २०० वर्षांपासून ही प्रथा या भागात पाळली जाते.
सोशल मीडियावर चर्चा
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर तुफान चर्चा सुरू झाली आहे. एका युजरने “अरे व्हा, मी कधीही या प्रथेविषयी ऐकलं नाही. या पुरुषांच्या धैर्याला सलाम. जय माता दी”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या युजरनं कशा प्रकारे २०० वर्षांपासून बारोत समुदायाकडून आपल्या चुकांची माफी मागण्यासाठी ही प्रथा पाळली जात असल्याचं नमूज केलं. एका युजरनं या प्रथेच्या माध्यमातून पुरुषांना सहवेदना आणि महिलांचा सन्मान शिकवला जात असल्याचं म्हटलं. तसेच, बंगालमध्येही काही भागात ही प्रथा पाळली जात असल्याचं नमूद केलं.