Sam Pitroda Remark on China : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचे विधान पुन्हा एकदा वादात सापडले आहे. भारत-चीन वाद हा अमेरिकेने उगाच वाढवला असल्याचे पित्रोदा म्हणाले आहेत. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षाने भारताची जमीन चीनला देऊन टाकल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, “चीनकडून काय धोका आहे हे मला समजत नाही. मला वाटते की हा मुद्दा अनेकदा प्रमाणाबाहेर वाढवला जातो कारण अमेरिकेला शत्रू कोण आहे याची व्याख्या करण्याची सवय आहे. मला वाटते की सर्व राष्ट्रांनी एकमेकांशी संघर्ष नाही तर सहकार्य करण्याची वेळ आली आहे.”

नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्यातील सीमाप्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. याच्या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी हे विधान केले आहे. हा प्रश्न सोडणव्यासाठी दोन देशांमधील चर्चेचा मार्ग आपण स्वीकारला असल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली ऑफर भारताने नाकारली आहे.

दरम्यान पित्रोदा यांनी पुढे बोलताना भारत आणि चीन यांच्यातील वादादरम्यान भारताच्या भूमिकेवरही टीका देखील केली. “असा दृष्टिकोन शत्रू तयार करतो,” असे पित्रोदा म्हणाले.

“आपण आपली साचेबद्ध पद्धत बदलली पाहिजे. चीन आपला शत्रू आहे हे ठरवणे न्यायाला धरून नाही. फक्त चीनसाठीच नाही, तर सर्वांसाठीच. संवाद वाढवायला शिकण्याची वेळ आली आहे. फक्त आदेश आणि नियंत्रणच नाही तर सहभाग, सहकार्य आणि सह-निर्मिती करा,” असेही काँग्रेस नेते पित्रोदा म्हणाले.

भाजपाने सॅम पित्रोदा यांच्या विधानावर ताबडतोब टीका केली आहे. तसेच याबरोबरच भाजपाने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर चीनची स्तुति केल्याचा, तसेच चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय)ला पाठिंबा देण्याचा आरोपही केला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत हे गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले की, “ज्यांनी आपली ४०००० चौरस किलोमीटर जमीन चीनच्या स्वाधीन केली, त्यांना अजूनही ड्रॅगनपासून कोणताही धोका दिसत नाही…राहुल गांधी यांना चीनबद्दल कौतुकाची भावना आहे आणि IMEEC जाहीर झाली त्याच्या एक दिवस आधी ते बीआरआय करिता प्रार्थना करत होते यात कोणतेही आश्चर्य नाही. चीनबद्दल काँग्रेस पक्षाला असलेल्या आकर्षणाचे मूळ २००८ च्या गूढ काँग्रेस-सीसीपी सामंजस्य करारात दडलेले आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sam pitroda remark on china bjp criticize congress rahul gandhi marathi news rak