राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी हेच एनडीएचे प्रमुख नेते आणि देशाचे तिसरे पंतप्रधान होतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र, नरेंद्र मोदींचं आगामी सरकार हे एन. चंद्राबाबू नायडू यांची तेलुगू देशम पार्टी आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या भरवशावर उभं राहणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. मागील दोन निवडणुकांमध्ये, म्हणजेच २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी ५६ इंचांची छाती काढून ज्या रुबाबात चालत होते ते चित्र आता दिसत नाही. त्यांची देहबोली आता बदलली आहे, त्यांची भाषा आता नरमली आहे, कारण त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध होऊ लागला आहे. ही मला मिळालेली माहिती आहे. एवढंच नव्हे तर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही विरोध आहे.”

संजय राऊत म्हणाले, “मोदींना संघाचा विरोध आहे कारण या निवडणुकीत मोदींचा एक प्रकारे पराभव झाला आहे आणि एक पराभूत माणूस देशाचा पंतप्रधान कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजपा आणि एनडीएने ही निवडणूक मोदींच्या नेतृत्वात लढवली होती. परंतु, त्यांना बहुमत मिळालं नाही. आता भाजपा मित्र पक्षांच्या कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करत आहे.”

ठाकरे गटातील खासदार नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले, “तुम्हाला लोकशाहीची चाड असेल तर तुम्ही तुमच्या संसदीय पक्षात मतदान घ्यायला हवं आणि तुमच्याच लोकांना विचारायला हवं की त्यांना पुढचे पंतप्रधान म्हणून तुम्ही हवे आहात का?” राऊत म्हणाले, माझ्या माहितीनुसार मोदींचा मार्ग सोपा नाही. त्यांनी जबरदस्तीने सरकार बनवण्याचा प्रयत्न केला तरी ते टिकणार नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपा नेत्यांची रडारड चालू झाली आहे. तसेच मोदींना त्यांच्याच पक्षातून विरोध होऊ लागला आहे. त्यांची पक्षात दादागिरी चालू होती ती यापुढे चालणार नाही.”

हे ही वाचा >> VIDEO : राहुल गांधींच्या प्रश्नावर शाहरुख खानने पुढाऱ्यांना दिलेला मोलाचा सल्ला, मनमोहन सिंग यांनीही केली प्रशंसा

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असा एनडीएचा ठराव मंजूर झाला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नितीन गडकरी किंवा राजनाथ सिंह यांच्या नावांचा विचार करू शकतो का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “मी सध्या दिल्लीत आहे आणि माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील वरिष्ठ नेतृत्व इतर पर्याय शोधत आहे. कोणाला पंतप्रधान करायचं यावर त्यांच्या चर्चा चालू आहेत. पंतप्रधान कोणाला करायचं हा जरी भाजपाचा प्रश्न असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.”

हे ही वाचा >> Lok Sabha Election Result 2024 Live Updates : भाजपा नेते नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल

संजय राऊत म्हणाले, “२०१४ आणि २०१९ च्या पाशवी बहुमतानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच गुलाम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आज संघ अशा स्थितीत आहे की ते एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात. मोदींना घरी पाठवू शकतात.”