दिल्लीच्या नोएडा शहरातील गौड सिटी -२ येथील एका उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गृहसंकुलात धक्कादायक प्रकार घडला. एका सात वर्षांच्या मुलाने भटक्या कुत्र्याच्या पिल्लाला २० फूट उंचीवरून खाली असलेल्या तळघरात फेकले. या घटनेनंतर प्राणी मित्र संघटनांनी तक्रार दाखल केली असून या तक्रारी विरोधात आता गृहसंकुलातील रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्या प्राणीमित्र असलेल्या महिलेने ही तक्रार दाखल केली, ती भटक्या कुत्र्यांना अन्न देत असते. त्यामुळे या महिलेविरोधात रहिवाशांनी रोष व्यक्त केली असून तिला मारहाणही केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात वर्षांच्या मुलाने आपल्या वडिलांसमोर कुत्र्याच्या पिल्लाला उचलले आणि उंचावरून त्याला खाली फेकले. यावेळी वडिलांनी या कृत्याचा मोबाइलमध्ये व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी १४ अव्हेन्यू सोसायटीमध्ये घडली. पिपल फॉर अनिमल्स या संस्थेच्या स्वयंसेविका सुरभी रावत यांनी सदर मुलाच्या वडीलांविरोधात बिसरख पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ३ फेब्रुवारी) तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ४२९ (गुरेढोरे किंवा इतर प्राणी यांना ठार मारणे किंवा विकलांग करून आगळीक करणे) आणि प्राणी अत्याचार विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

“अमानवी कृत्य!” कुत्र्याच्या पिल्लाला पाजली व्हिस्की; धक्कादायक घटनेचा Video Viral

“या घटनेत वडिलांनी आधी व्हिडिओ काढला आणि नंतर तो सोशल मीडियावर पसरवला. ते आपल्या मुलाला हे कृत्य करण्यापासून थांबवूही शकले असते. वडिलांच्या निष्काळजीपणामुळे मुक्या प्राण्याशी अमानवी व्यवहार केला गेला. वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कुत्र्याच्या पिलाबरोबर खेळत होता, खेळता-खेळता त्याने पिल्लाला उंचावरून फेकले”, अशी माहिती बिसरख पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

भटके कुत्रे माणसांवर हल्ले का करतात? चावा घेतल्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा यावर काय सांगतो…

प्राणीमित्र स्वयंसेवकांनी सांगितले की, सदर कुत्र्याचं पिलू जागेवरच ठार झालं. मात्र संकुलातील रहिवासी तो जिवंत असल्याचं सांगत आहेत. पोलिसांनीही सदर कुत्र्याच्या पिल्लाचा थांगपत्ता लागलेला नसल्याचे सांगितले. रविवारी जेव्हा याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे कळले, तेव्हा १४ अव्हेन्यू इमारतीमधील अनेक रहिवासी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी भटक्या कुत्र्यांना संकुलातून बाहेर काढले.

‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’!

१४ अव्हेन्यू इमारतीमधील रहिवासी आणि भाजपाचे पदाधिकारी मुकेश चौहान यांनी सांगितले की, परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. उद्यानात खेळणाऱ्या मुलांवर भटके कुत्रे रोज हल्ले करत आहेत. त्यामुळेच भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven year old boy throws puppy from 20 feet in noida his father records it on phone kvg