Sharad Pawar On Supreme Court Bhushan Gavai: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या घटनेवेळी सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत त्या वकिलाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’, अशा स्वरुपाच्या घोषणा या वकिलाने घटनेवेळी दिल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत या घटनेचा निषेध केला आहे. ‘आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी काय म्हटलं?
“लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते.त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा,संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
“आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 6, 2025
न्यायालयात नेमकं काय घडलं?
एक वकील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने धावून गेला आणि तो पायातला बूट काढू लागला. त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्याच्या दिशेने धावले. तो वकील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि न्यायालयाबाहेर नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. “सनातन का अपमान… नहीं सहेगा हिंदुस्तान…” अशा घोषणा या वकिलाने यावेळी दिल्या. त्याला न्यायालयाबाहेर नेत असताना देखील त्याची घोषणाबाजी चालू होती.
दरम्यान, या घटनेनंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायालयाचं कामकाज थांबू दिलं नाही. त्यांनी कार्यवाही चालू ठेवण्याचं आवाहन केलं. भूषण गवई म्हणाले की, “हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही.”