Shehbaz Sharif Diwali Wishesh to Hindu Community: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी केलेली एक सोशल पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान व जगभरातील हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, असं करताना सर्वाधिक हिंदू राहात असलेल्या भारताचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला आहे. तसेच, शांततेसंदर्भात काम करण्यासाठी शाहबाज शरीफ यांनी हिंदू समुदायाला आवाहनदेखील केलं आहे. शरीफ यांच्या या पोस्टवर भारतीयांकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काय आहे शाहबाज शरीफ यांच्या पोस्टमध्ये?
शाहबाज शरीफ यांनी हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “दिवाळीच्या या पवित्र मुहूर्तावर मी पाकिस्तान व जगभरातील हिंदू समुदायाला मन:पूर्वक शुभेच्छा देतो. या दिवशी आपली घरं आणि हृदय दिवाळीच्या प्रकाशात उजळून निघत असताना या उत्सवामुळे काळोख दूर व्हावा, सौहार्दाचं वातावरण तयार व्हावं आणि शांतता व समृद्धीच्या भवितव्याकडे आपलं मार्गक्रमण व्हावं”, असं शरीफ यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“आपल्या समाजासमोर असमानता, असहिष्णूता अशी अनेक आव्हानं उभी आहेत. पण त्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्याच्या आपल्या निर्धाराला दिवाळीनिमित्त अंधाराच्या प्रकाशावर, चांगल्याच्या वाईटावर आणि आशेच्या निराशेवरील विजयाच्या प्रतिकातून प्रेरणा मिळो. प्रत्येक नागरिकाला त्याचा धर्म वा पार्श्वभूमीवरून भेदभाव न करता शांततापूर्ण जीवन जगता यावं व प्रगतीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होता यावं, यासाठी आपण सर्व मिळून काम करुयात”, असं आवाहन शाहबाज शरीफ यांनी पोस्टच्या शेवटी केलं आहे. शाहबाज शरीफ यांनी केलेलं आवाहन चर्चेत आलं आहे.
“…तेव्हाच हे शक्य आहे”
दरम्यान, शरीफ यांच्या पोस्टवर पाकिस्तानला आरसा दाखवणाऱ्या प्रतिक्रिया भारतीयांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. “पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे. पण जेव्हा पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आणि त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक बंद होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने शुभ दिपावली असेल!” अशी कमेंट एका युजरनं केली आहे.
शाहबाज शरीफ व्हायरल, कधी ट्रम्प तर कधी पुतिन!
गेल्या महिन्याभरात शाहबाज शरीफ आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या विचित्र वर्तनामुळे चर्चेत राहिले आहेत. आधी पुतिन यांच्यासोबतचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यात पुतिन यांनी दुर्लक्ष केल्यानंतरदेखील शरीफ त्यांच्या मागे-मागे धावताना दिसले होते. त्यानंतर काही दिवसांनी इस्रायल-हमास शांतता करारावरील चर्चेदरम्यान शाहबाज शरीफ यांनी जगात जिथे कुठे दोन देशांमध्ये संघर्ष आणि नंतर चर्चा सुरू झाली, त्या सगळ्याचं श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना देऊन त्यांच्यासाठी शांततेच्या नोबेल पुरस्काराची शिफारस केली. यावरूनही शाहबाज शरीफ यांना सोशल मीडिावर ट्रोल करण्यात आलं होतं.