पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान थेट त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला आहे. केंद्र सरकारने यावरून पंजाबमधील काँग्रेस सरकारवर टीका करत गंभीर आक्षेप घेतले आहेत. दुसरीकडे पंजाब सरकारने देखील या सगळ्या प्रकरणात आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तिसरीकडे ज्या आंदोलक शेतकऱ्यांमुळे पंतप्रधानांचा ताफा अडकला असं सांगितलं जातंय, त्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी देखील यासंदर्भात आपली चूक नसल्याचं म्हटलेलं असताना आता शिवसेनेनं या सगळ्या प्रकरणावरून केंद्रातील भाजपा सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच, पंतप्रधानांच्या सुरक्षेसोबतच पुलवामा हा देखील चिंतेचाच विषय असल्याचं नमूद केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण सगळेच अध्यात्माच्या शेवटच्या बिंदूला!

पंजाबमधील घटनेनंतर भाजपाच्या देशभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मंत्र, जाप, पारायणं केली. यावरून सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं निशाणा साधला आहे. “मोदींसाठी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी, कार्यकर्त्यांनी जागोजाही पूजाअर्चा, महामृत्यूंजय जप, यज्ञ, महाआरत्यांचं आयोजन सुरू केलं आहे लोकांनी घरात आणि बाहेर धूप-आरत्या करत पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या. उत्तर प्रदेश, आसामचे मुख्यमंत्री मंदिरात पूजेला बसले. एकंदरीत संपूर्ण देशच ईश्वरपूजेत मग्न झाल्याने आपण सगळेच आध्यात्माच्या शेवटच्या बिंदूला पोहोचल्याचं स्पष्ट झालंय”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

पंतप्रधानांची सुरक्षा रामभरोसे नाही

“पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे. या विषयावरून राजकारण सुरू झालं असून त्यात देवादिकांनाही ओढण्यात आलं. आपल्या पंतप्रधानांची सुरक्षा रामभरोसे नाही हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. जगातल्या दहा सर्वोच्च नेत्यांच्या तोडीची सुरक्षा व्यवस्था त्यांना लाभली आहे. सुरक्षेसाठी एसपीजी कमांडोंचं कवच आहे. नुकतीच १२ कोटींची मेबॅक बुलेटप्रूफ गाडीही त्यांच्या ताफ्यात सामील झाली आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधानांचा बालही बाका होणार नाही”, असं शिवसेनेनं नमूद केलं आहे.

फिरोजपूरचे सभास्थान मोकळेच राहिले, हीसुद्धा देवाचीच कृपा…

दरम्यान, ज्या फिरोजपूरच्या सभेसाठी मोदी जाणार होते, तिथे लोक फिरकलेच नसल्याचा दावा केला जात आहे. त्यावरूनही अग्रलेखात टोला लगावण्यात आला आहे. “फिरोजपूरला पंतप्रधानांची जाहीर सभा होती. सभेसाठी किमान ५ लाख शेतकरी जमतील असे ढोल वाजवण्यात आले. ५ हजार बसेसची व्यवस्था केली. पण फिरोजपूरचं सभास्थान मोकळंच राहिलं. हीसुद्धा देवाचीच कृपा म्हणायची का? प्रत्येक गोष्टीच राजकारण आणू नये”, असं यात नमूद केलं आहे.

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद : नेटिझन्सनी शोधून काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ; सोशल मीडियावर तुफान चर्चा!

पंतप्रधान मोदी इतके अस्वस्थ कधीच पाहिले नव्हते

“रस्त्याने जायचा निर्णय अचानक घेतला. त्यामुळे गोपनीय निर्णयाची माहिती इतर कुणाला असण्याची शक्यता नसावी. तरीही रस्त्यात आंदोलक होते. त्यामुळे पंतप्रधानांना माघारी जावं लागल्याचं सांगण्यात आलं. पण मी जिवंत पोहोचू शकलो, असं तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा अशा भावना जाता जाता पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी इतके अस्वस्थ कधीच पाहिले नव्हते. मोदींच्या सुरक्षेची काळजी देशवासीयांनाही वाटत आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत, हे यानिमित्ताने देवळांत घंटा वाजवून राजकीय जागरण करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे”, असा टोला देखील अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena targets pm narendra modi punjab visit security breach bjp politics pmw