Shubhanshu Shukla Message From Space Axiom-4 Mission : भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी त्यांच्या तीन सहकाऱ्यांबरोबर मिळून ‘ॲक्सिऑम-४’ या अंतराळ मोहीमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण केलं. नासाच्या फॉल्कन-९ या रॉकेटद्वारे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांनी अवकाशात उड्डाण केलं. यानिमित्ताने ४१ वर्षांनंतर भारतीय व्यक्ती अंतराळात गेली आहे. याआधी ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाच्या मदतीने अवकाश मोहीमेवर गेले होते. आता वायूदलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ मोहिमेवर गेले आहेत. एक वर्षाचं प्रशिक्षण व कठोर मेहनतीनंतर शुक्ला यांची नासाने या मोहीमेसाठी निवड केली आहे.

दरम्यान, शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून पृथ्वीवर पहिला संदेश पाठवला आहे. या संदेशात शुक्ला यांनी म्हटलं आहे की “नमस्कार, माझ्या प्रिय बांधवांनो, what a ride… ४१ वर्षांनंतर आपण पुन्हा एकदा अंतराळ प्रवासावर निघालो आहोत. ही राइड भारी आहे. आम्ही सध्या ७.५ किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहोत. माझ्याबरोबर, माझ्या खांद्यावर आपला तिरंगा आहे. हा तिरंगा मला सांगतोय की मी या प्रवासात एकटा नाहीये. मी तुम्हा सर्वांबरोबर इथे आहे”.

भारताच्या ह्युमन स्पेस प्रोग्रामची सुरुवात

शुभांशू शुक्ला यांनी म्हटलंय की “आम्ही आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. ही मोहीम भारताच्या ह्युमन स्पेस प्रोग्रामची सुरुवात आहे. त्यामुळे मला वाटतंय की सर्व भारतीयांनी या प्रवासात सहभागी व्हायला हवं. तुमची छाती देखील अभिमानाने भरून आली पाहिजे. तुम्ही देखील माझ्याइतकाच उत्साह दाखवा. चला तर, आपण सगळे मिळून भारताच्या या ह्युमन स्पेस जर्नीची सुरुवात करुया. जय हिंद, जय भारत”. २८ तासांच्या प्रवासानंतर शुक्ला यांचं यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात दाखल होईल, असं नासाने सांगितलं आहे.

भारतीय वायूदलाचा सलाम

शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळयानाने अवकाशात झेप घेतल्यानंतर भारतीय वायूदलाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये वायूदलाने म्हटलं आहे की “आकाश जिंकण्यापासून ते ताऱ्यांना स्पर्श करण्यापर्यंतचा प्रवास… भारतीय वायूदलातील एका योद्ध्याच्या दृढनिश्चयाने प्रेरित प्रवास सुरू झाला आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी एका ऐतिहासिक अंतराळ मोहिमेवर उड्डाण केलं आहे. त्यांनी देशाचा अभिमान वाढवला आहे. हा अभिमान केवळ पृथ्वीपर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यापलिकडे गेला आहे. हा भारतीयांसाठी ‘देजा-वू’ क्षण आहे. ४१ वर्षांपूर्वी स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांनी भारताचा तिरंगा पृथ्वीच्या पल्याड नेला होता. आता शुभांशू शुक्ला आपला तिरंगा घेऊन जात आहोत”.