Sonam Wangchuk CBI inquiry over FCRA Violation : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांनी सुरू केलेल्या एका संस्थेविरोधात परदेशी योगदान (नियमन) कायद्याच्या (एफसीआरए) कथित उल्लंघनासंदर्भात प्राथमिक चौकशी चालू केली आहे. गृहमंत्रालयाच्या तक्रारीनंतर दोन महिन्यांपूर्वी ही चौकशी सुरू करण्यात आली होती जी अजूनही चालू आहे. याबाबत सोनम वांगचुक यांनी पीटीआयला सांगितलं की १० दिवसांपूर्वी सीबीआयचं एक पथक सरकारी आदेश घेऊन आलं होतं. या आदेशात म्हटलं होतं की केंद्रीय गृहमंत्रालयाच्या तक्रारीनुसार ते हिमालयीन इन्स्टिट्युट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज लडाखमधील (एचआयएएल) कथित एफसीआरए कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी कारवाई करत आहेत.
लडाखच्या लेह शहरात बुधवारी (२४ सप्टेंबर) सुरक्षा दल आणि आंदोलकांदरम्यान झालेल्या संघर्षात चार जणांचा बळी गेला तर ५९ जण जण जखमी झाले. यात २२ पोलिसांचा समावेश आहे. या हिंसाचाराला सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरलं आहे. लडाखला राज्याचा दर्जा मिळावा तसेच घटनेचं सहावे परिशिष्ट लागू करावं या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि इतर काहीजण गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान उपोषणाकर्त्यांची प्रकृती बिघडली. त्यापैकी दोघांना मंगळवारी रुग्णालयात दाखल केल्याने आंदोलकांचा उद्रेक झाला. त्यातून आंदोलनाने हिंसक वळण घेतलं.
गृह मंत्रालयाकडून सोनम वांगचुक यांच्यावर ठपका
दरम्यान, गृहमंत्रालयाने आरोप केला आहे की सोनम वांगचुक यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे गर्दीला चिथावणी मिळाली आणि त्यातून हे हिंसक आंदोलन झालं. सरकार व लडाखमधील संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये चालू असलेल्या चर्चेतील प्रगतीमुळे काही राजकीय हेतू असलेल्या व्यक्ती समाधानी नाहीत, त्यामुळे ते सरकार व जनतेच्या संवाद प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.
हिंसाचारामुळे वांगचुक यांनी आंदोलन मागे घेतलं
दरम्यान, हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांनी त्यांचं १५ दिवसांपासून चालू असलेलं उपोषण संपवलं. तसेच त्यांनी लडाखमधील तरुणांना शांततेनं निदर्शन करण्याचं आवाहन केलं आहे. हिंसा करून पाच वर्षांपासून चालू असलेलं आपलं आंदोलन खिळखळं करू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वांगचुक हे एक अभियंते आणि टिकाऊ उत्पादनांचे संशोधक आहेत. २००९ साली आलेल्या ‘३ इडियट्स’ या हिंदी चित्रपटातील आमिन खानने साकारलेलं रँचो उर्फ फुनसुक वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावरून प्रेरित असल्याचं सांगितलं जातं. या चित्रपटामुळे सोनम वांगचुक प्रसिद्धीझोतात आले होते.