लेह : लडाखच्या इतिहासात कधीही असा हिंसाचार घडला नाही असे सांगून सोनम वांगचुक यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती लडाखचे पोलीस महासंचालक एस. डी. सिंग जामवाल यांनी शनिवारी दिली. पर्यावरणवादी कार्यकर्ते व लडाख राज्यासाठीच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या वांगचुक यांना शुक्रवारी लेहमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (रासुका) अटक करण्यात आली. यानंतर त्यांना राजस्थानमधील जोधपूर येथील तुरुंगात पाठवण्यात आले.
लेह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जामवाल यांनी लेहमध्ये बुधवारी झालेल्या हिंसाचाराला वांगचुकच जबाबदार असल्याचा दावा केला. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू तर ९० हून अधिक जण जखमी झाले. ‘वांगचुक यांच्या चौकशीचा तपशील सध्या उघड करता येणार नाही. ही प्रक्रिया सुरू आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर ते सर्व ‘यूट्यूब’वर उपलब्ध आहे. अरब राष्ट्रांमध्ये झालेला उठाव आणि नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेतील अलीकडच्या अशांततेबद्दल त्यांचे (वांगचुक) भाषण चिथावणी देणारे ठरले,’ असे जामवाल यांनी सांगितले.
त्यांच्याविरुद्ध परदेशी निधी, ‘परदेशी निधी नियमन कायद्या’चे (एफसीआरए) झालेले उल्लंघन आदींची चौकशी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक केली. जो वांगचुक यांच्या नेतृत्वाखालीली सुरू असलेल्या निदर्शनांची माहिती आणि त्याच्या ध्वनिचित्रफिती सीमेपलीकडे पाठवत होता.’ जामवाल यांनी वांगचुक यांच्या काही परदेश दौऱ्यांचा संदर्भ देत हे दौरे संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. ‘ते पाकिस्तानमध्ये ‘द डॉन’च्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि बांगलादेशलाही त्यांनी भेट दिली होती,’ असे जामवाल यांनी पत्रकारांना सांगितले.
‘गोळीबार करण्यास भाग पाडले’
‘पोलिसांना निदर्शकांवर गोळीबार करण्यास भाग पाडले गेले, अन्यथा संपूर्ण लेह खाक झाला असता’, असे स्पष्टीकरण पोलीस महासंचालक जामवाल यांनी दिले. पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचा आरोप आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘लेह ॲपेक्स बॉडी’ आणि कारगिल लोकशाही आघाडी (केडीए)ने केला होता. परंतु हा आरोप जामवाल यांनी फेटाळून लावला.
सोनम वांगचुक यांना झालेली अटक निषेधार्ह असून, लडाखमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपने नेहमीच लडाखमधील नागरिकांचा विश्वासघात केला. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. – मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस</p>
वांगचुक यांच्या काही परदेश दौरे संशयास्पद आहेत. ते पाकिस्तानमध्ये ‘द डॉन’च्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि बांगलादेशलाही त्यांनी भेट दिली होती, – एस. डी. सिंग जामवाल, पोलीस महासंचालक, लडाख
चार तासांसाठी संचारबंदी शिथिल
लेह शहरात शनिवारी दुपारी चार तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानांबाहेर गर्दी झाली होती. पोलीस आणि निमलष्करी दलांनी शनिवारी सकाळपासून गस्त आणि तपासणी वाढवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी कोणताही अनूचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.