राज्यसभेच्या ५६ जागा रिक्त झाल्याने आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ५६ पैकी ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्याने १५ जागांसाठी आज मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशच्या १०, कर्नाटकातील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होईल. तर, आजच याचा निकालही जाहीर होणार आहे.

उत्तर प्रदेशात चुरस

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने राज्यसभेच्या १० जागांसाठी आठ आणि विरोधी समाजवादी पक्षाने तीन उमेदवार उभे केले आहेत. राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याची संख्या भाजपा आणि सपा या दोन्ही पक्षांकडे आहे. परंतु, भाजपाने संजय सेठ यांना आठवे उमेदवार म्हणून उभे केल्यामुळे एका जागेवर सामना होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला जवळपास ३७ प्रथम प्राधान्य मतांची आवश्यकता असते.

हेही वाचा >> Rajya Sabha Election: राज्यसभेत २८ पैकी २४ नव्या चेहर्‍यांना संधी; लोकसभेसाठी भाजपाची मोठी रणनीती

कर्नाटकात काँग्रेसने बजावला व्हीप

कर्नाटकात चार जागा रिक्त असून सत्ताधारी क्रॉस व्होटिंगच्या भीतीने काँग्रेसने त्यांचा आमदारांना व्हीप बजावला आहे. तर, सर्व आमदारांना काँग्रेसने हॉटेलमध्ये हवलं आहे. अजय माकन, सय्यद नसीर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर (सर्व काँग्रेस), नारायणसा पट्टी (भाजप) आणि कुपेंद्र रेड्डी (जेडी(एस) – पाच उमेदवार रिंगणात आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत

त्याचप्रमाणे, हिमाचल प्रदेशमध्ये, काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना पक्षाचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांना मत देण्यासाठी व्हीप जारी केला आहे. परंतु, काँग्रेसकडून आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप भाजापाकडून केला जातोय. आमदारांची निवड लोकशाही पद्धतीने झाली असून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार मतदान करण्याचा अधिकार आहे, असा दावा भाजपाने केला आहे. हिमाचल प्रदेश राज्यसभेच्या निवडणुकीत ६८ पैकी ४० आमदार आणि तीन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासह काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे.

हेही वाचा >> रण राज्यसभेचे, लक्ष लोकसभेवर; उमेदवार निवडीतून भाजपची दीर्घकालीन रणनीती!

महाराष्ट्रासह ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक

१३ राज्यांतील जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि राजस्थान अशा ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. यामध्ये भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदेश, केंद्रीय आयटी मंत्री आश्विनी वैष्ण, सोनिया गांधी, मिलिंद देवरा, अशोक चव्हाणांसह अनेक नेते बिनविरोध निवडून आले असून त्यांच्या विजयाची आज औपचारिक घोषणा केली जाणार आहे. तर उर्वरित १५ जागांवर चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.