साखर उद्योग विकास मंडळ बरखास्त करणार
पीटीआय, नवी दिल्ली
अनावश्यक समित्या व कायदे रद्द करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अन्न मंत्रालयाने साखर उद्योग विकास मंडळ (डीसीएसआय) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
साखर नियंत्रण व परवाना मुक्त करण्यात आल्यानंतर या मंडळाची कुठलीही भूमिका उरली नव्हती. डीसीएसआयची स्थापना १९५४ मध्ये औद्योगिक विकास व नियंत्रण कायद्यानुसार करण्यात आली होती. हे मंडळ साखर कारखान्यांना परवाने देणे व इतर प्रश्नांमध्ये लक्ष देण्याचे काम करीत होते. डीसीएसआयची दर दोन वर्षांनी फेररचना केली जात असे. अन्न मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीसीएसआय आता कालबाह्य़ ठरले आहे कारण साखर कारखाने नियंत्रण व परवाने मुक्त करण्यात आले आहेत. या मंडळावर २५ सदस्य होते, पण आता हे मंडळच बरखास्त करण्याची अधिसूचना काढण्यात येणार आहे. साखर मानकासंबंधीची उपसमिती बरखास्त करण्यात येणार असून आता भारतीय मानक संस्था व भारतीय अन्न सुरक्षा व प्रमाणन प्राधिकरण साखरेचा दर्जा व त्याची देखरेख करण्याचे काम करीत आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळी समिती असण्याचे काही कारण नाही. याच मंडळाअंतर्गत असलेली स़्थायी संशोधन सल्लागार समिती ही साखर विकास निधी स्थायी समितीत विलीन करण्यात येणार आहे व नव्या उपसमितीचे नाव  संशोधन प्रकल्प अनुदान व मदत उपसमिती असे करण्यात आले आहे. साखर उद्योग १९९८ मध्ये परवानामुक्त करण्यात आला असून मे २०१३ मध्ये साखर क्षेत्रातील आणखी काही नियंत्रणे उठवण्यात आली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरस्काराबद्दल सोनियांकडून मनमोहन सिंग यांचे अभिनंदन
पीटीआय, नवी दिल्ली
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जपानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जपानकडून अत्यंत योग्य आणि लायक व्यक्तीस हा पुरस्कार मिळाल्यामुळे आमच्यासह संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. अशा प्रकारचा पुरस्कार मिळणारे मनमोहन सिंग हे पहिले मान्यवर ठरले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपला खरोखरच सन्मान झाला असून जपान सरकार आणि तेथील जनतेने आपल्याप्रति दाखविलेले प्रेम आणि आपुलकीने आपण भारावून गेलो आहोत, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले.
काँग्रेसची माध्यमांवर टीका
मनमोहन सिंग यांचे अभिनंदन करतानाच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली असून डॉ. सिंग यांना मिळालेल्या या पुरस्काराचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दुर्लक्षित का केले, अशी विचारणा पक्षाचे प्रवक्ते अजय माकन यांनी केली. आपली माध्यमे देशभक्त आहेत की केवळ ‘भाजपभक्त’? असा टोमणा माकन यांनी ट्विटरवरून मारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugar development corporation will dissolve