Supreme Court lawyer Rakesh Kishore vs CJI BR Gavai : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान राकेश किशोर या वकिलांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. न्यायालयातील सुरक्षकारक्षकानी प्रसंगावधान राखत या वकिलास सरन्यायाधीशांवर हल्ला करण्यापासून रोखलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान, बार काउसिल ऑफ इंडियाने वकील राकेश किशोर यांना प्रॅक्टिसमधून निलंबित केलं आहे. त्यांचं वय ७० च्या आसपास असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सरन्यायाधीशांनी खजुराहो येथील मंदिरांसंदर्भात केलेल्या एका टिप्पणीमुळे राकेश किशोर नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी सरन्यायाधीशांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वकील राकेश किशोर यांना ताब्यात घेणाऱ्या पोलिसांनी हिंदुस्तान टाइम्सला संगितलं की “हे वकील एक कागद घेऊन न्यायालयात आले होते. त्यावर लिहिलं होतं, सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान.”

राकेश किशोर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई नाही

पोलिसांनी सांगितलं की “राकेश किशोर यांनी न्यायालयात केलेल्या कृत्यानंतर त्यांची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नाही. कारण सरन्यायायाधीशांच्या कार्यालयाने आम्हाला सांगितलं आहे की या वकिलाविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करू नका. तसेच चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यास सांगितलं आहे. राकेश किशोर यांचा बूट व कागदपत्र त्यांच्या स्वाधीन करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे.

न्यायालयात नेमकं काय घडलं होतं?

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना वकील राकेश किशोर हे सरन्यायाधीशांच्या दिशेने धावून गेले आणि पायातील बूट काढू लागले. त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्यांच्या दिशेने धावले. वकील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं आणि न्यायालयाबाहेर नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. “सनातन का अपमान… नहीं सहेगा हिंदुस्तान…” , अशा घोषणा देखील त्यांनी यावेळी दिल्या.

सरन्यायाधीशांवरील रोषाचं कारण काय?

मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश म्हणाले, “जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत येतात. तिथल्या मूर्ती बदलणे किंवा नवी स्थापित करणे हे एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे.