Bibhav Kumar Swati Maliwal case : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. आम आदमी पार्टीच्या राज्यसभेवरील खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आज (१ ऑगस्ट) बिभव कुमार यांच्यासह आम आदमी पार्टीलाही सुनावलं. न्यायमूर्ती म्हणाले, “त्यांनी (बिभव कुमार) जी कृती केली आहे ते पाहून असं वाटतंय की एखादा गुंड मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फिरतोय.” न्यायमूर्तींनी बिभव कुमार यांच्या वकिलांना विचारलं की “मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान हा कोणाचा खासगी बंगला आहे का? मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अशा गुंडाला स्थान देणं योग्य आहे का?”
स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याच्या आरोपांनंतर बिभव कुमार यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर बिभव कुमार यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. बिभव कुमार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना एक नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणी पुढच्या बुधवारी (७ ऑगस्ट) होईल असं सांगितलं.
बिभव यांचे वकील अभिषेक सिंघवी न्यायालयात काय म्हणाले?
बिभव कुमार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी खंडपीठासमोर म्हणाले, “माझे आशील गेल्या ७५ दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यामुळे जामीनाबाबत निर्णय घेताना या गोष्टीचा विचार व्हावा.” तसेच सिंघवी यांनी प्रश्न उपस्थित केला की “स्वाती मालीवाल यांनी घटनेच्या तीन दिवसांनंतर पोलिसांत तक्रार का केली. तक्रार करण्यास इतका उशीर का केला? स्वाती मालीवाल यांना झालेली दुखापत साधारण होती, त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. घटना घडली त्याच दिवशी त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. मात्र त्यांनी तक्रार दाखल केली नाही. त्या तक्रार दाखल न करताच तिथून निघून का गेल्या?
हे ही वाचा >> भूस्खलनातील मृतांचा आकडा १६७; १९१ बेपत्ता, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
…अन् न्यायमूर्ती संतापले
न्यायमूर्ती म्हणाले, स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात बिभव कुमार यांच्यावर जे आरोप आहेत ते पाहता त्यांना बाहेर मोकळं सोडता येणार नाही. ते मालीवाल यांना मारहाण करत असताना मालीवाल यांनी त्यांना सांगितलं की त्यांना शारीरिक समस्या आहेत, त्यानंतरही बिभव कुमार थांबले नाहीत. या माणसाच्या डोक्यात तेव्हा काय चाललं होतं? ही सत्तेची मस्ती नव्हती का?