Swami Chaitanyananda Arrest: दिल्लीत धर्माच्या नावाखाली काळे धंदे करणाऱ्या एका स्वयंघोषित बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणले असून वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या महाराजावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीचा आरोप केला होता. या आरोपानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. १७ विद्यार्थिनींनी या बाबावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला आग्रा येथून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला होता. तसेच त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी त्याने न्यायालयात अर्ज देखील दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर रविवारी पहाटे ३:३० वाजता आग्रा येथील एका हॉटेलमधून स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच या बाबाने विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपानंतर प्रसिद्ध आश्रमाच्या प्रशासनाने स्वामी चैतन्यनंद सरस्वतीला संचालक पदावरून काढून टाकलं आहे. तसेच स्वामी चैतन्यनंद सरस्वती हा देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लूक-आउट नोटीस देखील जारी केली होती.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ६२ वर्षीय स्वयंघोषित बाबाला एका गुप्त माहितीच्या आधारे आग्रा येथून अटक करण्यात आली. एफआयआरनुसार, त्याने रात्री उशिरा काही विद्यार्थिनींना त्यांच्या निवासस्थानी येण्यास भाग पाडलं होतं आणि त्यांना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. तो त्याच्या फोनद्वारे विद्यार्थिनींच्या हालचालींवर लक्ष ठेवत असल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे.

३२ मुलींची लेखी तक्रार

पोलिसांनी सांगितलं “एकूण ३२ विद्यार्थिनींनी पार्थसारथीविरोधात तक्रार दाखल केली असून त्यापैकी १७ मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या मुलींनी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे. चैत्यनानंद त्यांना अश्लील मेसेजेस पाठवत होता, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत होता, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, असं या मुलींनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार स्वामी चैतन्यनंद सरस्वतीविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे.”

पार्थसारथीच्या कारवर UN ची नंबर प्लेट

दरम्यान, पोलिसांनी स्वामी चैतन्यनंद सरस्वतीची आलिशान कार जप्त केली आहे. या कारवर संयुक्त राष्ट्राची बनावट नंबर प्लेट लावण्यात आली आहे. पोलीस तपासात उघड झालं आहे की संयुक्त राष्ट्राकडून असा कोणताही नंबर जारी करण्यात आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून सीसीटीव्ही फूटेज, इतर डिजीटल डिव्हाइसेस, एनव्हीआर व हार्ड डिस्क्स जप्त आहेत. हे सर्व पुरावे फॉरेन्सिक टीमकडे तपासणी करण्यासाठी पाठवले आहेत.