Tanzania Election Violence 700 Deaths: टांझानियाच्या चाडेमा या प्रमुख विरोधी पक्षाने दावा केला आहे की, देशभरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या निवडणुकीतील गैरप्रकारांच्या विरोधातील हिंसक आंदोलनामुळे सुमारे ७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चाडेमा पक्षाचे प्रवक्ते जॉन किटोका यांनी शुक्रवारी सांगितले की, “देशभरातील विविध ठिकाणांहून मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण ७०० जणांचा मृत्यू झाला आहे.”

बुधवारी झालेल्या वादग्रस्त सार्वत्रिक निवडणुकीनंतर टांझानियात देशभर आंदोलने सुरू झाली आहेत. आंदोलकांचा आरोप आहे की, अध्यक्ष सामिया सुलुहू हसन आणि त्यांच्या सत्ताधारी चामा चा मापिंडुझी पक्षाने या निवडणुकीत गैरप्रकार केला आहे.

बुधवारी झालेल्या निवडणुकीनंतर आंदोलकांनी पोलीस ठाण्यांवर हल्ले केले. याचबरोबर त्यांचा सुरक्षा दलांशीही संघर्ष झाला. तसेच आंदोलकांनी अनेक सरकारी कार्यालये जाळल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले.

देशभरातील या आंदोलनांना हिंसक वळण लागताच, सरकारने इंटरनेट बंद केले आणि कर्फ्यू लादला. एएफपीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही टांझानियामध्ये इंटरनेट बंद होते. याचबरोबर परदेशी पत्रकारांना वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आले.

या हिंसक आंदोलनानंतर टांझानियाचे लष्करप्रमुख जनरल जेकब मकुंडा यांनी आंदोलकांचा उल्लेख “गुन्हेगार” असा केला आहे. तसेच देशभरातील ही परिस्थिती लवकर आटोक्यात येईल असे सांगितले आहे. एपी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, काही शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तेथे सैन्य तैनात करण्यात आले आहे.

आज (शुक्रवारी) हजारो आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरले आणि निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करणे थांबवावे, अशी मागणी केली. आंदोलकांनी या निकालांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. मोठ्या प्रमाणात लष्कर उपस्थित असूनही, आंदोलकांनी आंदोलनस्थळ सोडण्यास नकार दिला.

सरकारी प्रवक्ते गर्सन मिसिग्वा यांच्या व्हेरिफाइड इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टमध्ये जाहीर करण्यात आले आहे की, सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढील आदेश येईपर्यंत घरूनच काम करावे. तसेच इतर नागरिकांनी अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.