Tejashwi Yadav Appointed Legislative Party Leader 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाने पुन्हा एकदा तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्षनेत म्हणून निवड केली आहे. पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष लालू यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी, खासदार मीसा भारती यांच्यासह पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते.
या महत्त्वाच्या बैठकीत लालू यादव यांनी तेजस्वी यादव यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, ते वर्तमान आणि भविष्याचे नेते आहेत आणि ते पक्ष चांगल्या पद्धतीने चालवत आहेत.
यावेळी लालू यादव यांनी तेजस्वी यादव यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “ते (तेजस्वी यादव) पक्ष मजबूत करत आहेत आणि पक्षाचा विस्तार करत आहेत. त्यांच्या कामामुळे पक्षाची व्होट बँक वाढली आहे. ते पक्षाचे वर्तमान आणि भविष्य आहेत.”
बिहार निवडणुकीत काय घडले?
भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.
एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.
दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यांना केवळ ३५ जागांवर विजय मिळवता आला. महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दलाला केवळ २६ जागांवर विजय मिळाला. २०२० च्या निवडणुकीत ७५ जागांसह राष्ट्रीय जनता दल बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर गेल्या निवडणुकीत १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ ६ जागांवर यश मिळाले.
