अहमदाबाद : काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार असून त्यावर विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पक्षामध्ये निर्णयाचे विकेंद्रीकरण केले जाणार असून जिल्हाध्यक्षांना व्यापक अधिकार दिले जातील व पक्षाची धोरणे ब्लॉक स्तरापर्यंत राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हाध्यक्ष केंद्रीय नेतृत्वाला उत्तरदायी असेल. या महत्त्वाच्या संघटनात्मक निर्णयावर बुधवारी होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब केले जाणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संघटनात्मक फेरबदलाची निकड बोलून दाखवली होती. त्यासाठी प्रस्थापितांची गच्छंती झाली तरी चालेल असे राहुल गांधींचे म्हणणे होते. संघटना बळकट करण्यासाठी जिल्हास्तरावर व विशेषत्वाने ब्लॉकस्तरावर बदल करण्यावर चर्चा होत होती. गेल्या आठवड्यामध्ये देशभरातील ७५०हून अधिक जिल्हाध्यक्षांची दिल्लीत बैठक घेण्यात आली होती व त्यामध्ये जिल्हाध्यक्षांच्या सूचनांची राहुल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गांभीर्याने नोंद घेतली होती. पक्षाच्या १७०० हून अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी होणाऱ्या अधिवेशनात राहुल गांधी व खरगेंच्या भाषणांमध्ये संघटनात्मक फेरबदलाची दिशा स्पष्ट होईल असे संकेत वेणुगोपाल यांनी दिले.

या बैठकीमध्ये राजकीय, आर्थिक व सामाजिक ठरावही मंजूर केले जातील. विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मंगळवारी चर्चा झालेल्या हे ठराव बुधवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीमध्ये संमत केले जातील, अशी माहिती माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठरावाचे संभाव्य मुद्दे

● वक्फच्या नव्या कायद्याला काँग्रेसचा विरोध असून ही भूमिका अधिक स्पष्ट करणारा सामाजिक ठराव

● धर्मांतरविरोधी कायद्याविरोधात, धार्मिक द्वेष व हिंसाचार, भाषेवरून होणारे संघर्ष, जातीद्वेष, प्रांतिक द्वेष या विरोधात सामाजिक ठराव

● आर्थिक ठरावामध्ये प्रामुख्याने अमेरिकेने लादलेले आयात कराचे जाचक धोरण व मोदी सरकारने घेतलेली बोटचेपी भूमिका तसेच, देशातील औषध उत्पादन, वाहन उद्याोग, शेती आदी क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम यांचा समावेश

● आंतरराष्ट्रीय विषयांसंदर्भातील ठरावामध्ये चीनची घुसखोरी, ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याची चीनची योजना, त्याचा आसाम व ईशान्येकडील राज्यांवर होणारा परिणाम तसेच, इस्रायल-पॅलेस्टाइन संबंध

प्रियंका गांधींवर मोठी जबाबदारी

वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षामध्ये संघटना बळकट करण्यासाठी प्रियंका यांच्याकडे अधिकार दिले जाऊ शकतात. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीमध्येही त्यांना सक्रिय केले जाऊ शकते, असे सांगितले जाते. पक्षाच्या महासचिव असूनही त्या अधिवेशनामध्ये सहभागी न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भातील प्रश्नावर, त्यांनी काही कारणास्तव गैरहजर राहण्याची परवानगी पक्षाकडे मागितली होती, असे संदिग्ध उत्तर वेणुगोपाल यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The beginning of organizational changes there was a meeting of 150 leaders during the congress session ssb