काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांच्या आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर I.N.D.I.A हे नाव धारण केलं आहे. या नावावर मोदी सरकारकडून टीका केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच हे इंडिया नाही घमंडिया आहेत असंही म्हटलं होतं. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या नावावर टीका केली होती. आता भाजपाने चक्क एक जाहिरात ट्वीट केली आहे आणि विरोधकांच्या इंडिया या नावावर टीका केली आहे.
काय आहे जाहिरातीत?
भाजपाचे प्रवक्ते अमित मालवीय यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी ही जाहिरात ट्वीट केली आहे. या जाहिरातीत एक मोठा वर्ग दाखवण्यात आला आहे. त्या वर्गात मॅडम विचारतात, गजोधर होमवर्क कहाँ है तुम्हारा? त्यावर गजोधर म्हणतो मॅम मेरी नोटबुक कुत्तेने खाली. त्यावर सगळी मुलं हसू लागतात. मग मॅडम म्हणतात, ए गजोधर चुप बेशरम, झूठ बोलनेमें शर्म नहीं आती? मग दुसरा प्रसंग आहे त्यात या गजोधरला १०० पैकी ० मार्क मिळवतात आणि मुलं त्याला गधोहर असं चिडवत असतात. त्यानंतर हा मुलगा आईकडे येतो. आई विचारते परत शून्य मार्क? त्यावर हा मुलगा म्हणतो सब मुझे गधोहर चिढाते हैं. आप प्लीज कुछ करो. त्यावर आई म्हणते, तुम्हाला नाम बदलते हैं. नया नाम नयी पहचान. मग नाव पुकारलं जातं इंदरसिंग.. हे नाव पुकारल्यावर तोच मुलगा चालत येतो. त्याला १०० पैकी १०० मार्क मिळालेले असतात. त्यावर तो मुलगा खुश होतो आणि तेवढ्यात त्याचं स्वप्न मोडतं. गजोधर हो या इंदर नाम बदलनेसे काम नहीं बदलता अपनी हरकते ठिक करो पहले असं सर त्या मुलाला ओरडतात. त्यानंतर ओळी येतात या व्हिडीओचा युपीए किंवा I N D I A शी काही संबंध नाही.
हा व्हिडीओ पोस्ट करुन भाजपाने काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. जो मुलगा या खोचक जाहिरातीत दाखवण्यात आला आहे तो अगदी राहुल गांधींसारखेच हातवारे करतानाही दिसतो. ही जाहिरात म्हणजे काँग्रेससह विरोधी पक्षांची जी आघाडी करण्यात आली आहे त्या इंडियाची खिल्ली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
हे पण वाचा- “I.N.D.I.A नाही हे तर ‘घमंडिया’…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या आघाडीला दिलं नवं नाव
केंद्र सरकारने नऊ वर्षांमध्ये विविध योजनांमधून ‘इंडिया’ हा शब्द प्रचलित केला होता. पण, तो विरोधकांच्या महाआघाडीने बळकावला असल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. दिल्ली संदर्भातील विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या महाआघाडीचा ‘इंडिया’ असा उल्लेख करण्याचे जाणीवपूर्वक टाळले होते. विरोधकांचा उल्लेख ‘इंडिया’ असा न करता ‘यूपीए’ करण्याचे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत.
हे पण वाचा- उलटा चष्मा : ‘इंडिया’ला पर्याय हवा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एनडीए’च्या खासदारांच्या राज्यनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये ‘इंडिया’ला उत्तर कसे द्यायचे यावर चर्चा करण्यात आली होती. ‘इंडिया’ या शब्दावरून विरोधकांची टिंगल केली तर स्वतःची मस्करी केल्यासारखे दिसेल. ही नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा ‘इंडिया’ हा शब्दच वापरू नये, अशा सूचना भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.