पीटीआय, नवी दिल्ली

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणारा ‘मन की बात’ कार्यक्रम पुढील तीन महिने प्रसारित होणार नसल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या कार्यक्रमातून दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या आचारसंहितेमुळे या कार्यक्रमाचे प्रसारण तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येईल.

एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे मार्चपासून आचारसंहिता लागू होईल. याबाबतची घोषणा निवडणूक आयोग पुढील महिन्यात करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यानिमित्ताने त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या युवा वर्गाला मोठय़ा संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा >>>प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शाहनी यांचे निधन; कलात्मक हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला

आपण यापुढे ‘मन की बात’च्या १११ व्या भागात भेटू. ही संख्या शुभ आहे, त्यामुळे या शुभ क्रमांकापासून सुरू करण्याहून आणखी चांगले काय असेल, अशा शब्दांत रविवारी ‘मन की बात’च्या ११० व्या मालिकेत पंतप्रधान मोदींनी जनतेसमोर आपण सत्तेत राहणार असल्याचा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केला.

८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होईल. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ‘नारी शक्ती’चे कौतुक केले. प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगतीची नवी उंची गाठत आहेत. येत्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी, देशाच्या विकासात्मक प्रवासातील महिलांच्या सहभागाबद्दल त्यांना वंदन करण्याची संधी आहे, असे ते म्हणले. यावेळी त्यांनीमहाराष्ट्रातील कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशीही पंतप्रधानांनी संवाद साधला. पाटील या सेंद्रीय शेतीत काम करतात.