The Sabarmati Report Tax Free in UP : गुजरातमध्ये २००२ साली गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या अग्निकांडावर बेतलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉलिवुड अभिनेता विक्रांत मॅसीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री देखील करण्यात आला आहे. यामध्ये आता उत्तर प्रदेशची देखील भर पडली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमध्ये देखील हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ केल्याची घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयानंतर ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट भाजपाची सत्ता असलेल्या सहा राज्यात टॅक्स फ्री झाला आहे. यापूर्वी हरियाणा, राजस्थान, छत्तिसगड, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्येदेखील हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, लखनऊ येथे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एका स्पेशल स्क्रिनींगदरम्यान काही कॅबिनेट मंत्र्यांबरोबर ‘द साबरमती रिपोर्ट’हा चित्रपट पाहीला. यावेळी अभिनेता विक्रांत मॅसी आणि चित्रपटाशी संबंधीत इतरही काहीजण उपस्थित होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशामध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

“मी साबरमती रिपोर्टच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, ज्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून सत्य देशाच्या जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे आणि गोध्रा घटनेसंबंधीचे सत्य जाणून घेतले पाहिजे”, असे मत योगी आदित्यनाथ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये टॅक्स फ्री झाल्यानंतर ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटातील कलाकार अभिनेता विक्रांत मॅसी आणि अभिनेत्री राशी खन्ना यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

हेही वाचा >> Zomato CEO : बिनपगारी अन् फुल्ल अधिकारी, झोमॅटोच्या ‘या’ पदासाठी आले दहा हजार अर्ज; नियम अन् अटी तर वाचा!

दरम्यान साबरमती रिपोर्ट हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. कारसेवकांनी भरलेली रेल्वे १७ फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा येथे पेटवून देण्यात आली होती. ज्यामध्ये ९० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती.

‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट एकता कपूर निर्मित‍ असून १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The sabarmati report yogi adityanath declares film tax free in utter pradesh rak