योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. या वक्तव्यावरुन तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर खोचक टीका केली आहे. २०११ मध्ये घडलेल्या घटनेचा संदर्भ देत मोईत्रा यांनी रामदेव बाबांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “आता मला कळलं की रामलीला मैदानातून पतंजलि बाबा महिलेच्या पोषाखात का पळाले होते. ते म्हणतात त्यांना साडी, सलवार सुट आवडतात आणि…”, असं ट्वीट मोईत्रा यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदेव बाबांच्या मेंदूत स्ट्रॅबिस्मस झाल्याने त्यांचे विचार एकतर्फी झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या आहेत. २०११ मध्ये रामलीला मैदानातील आंदोलनातून नाट्यमयरित्या पळून गेलेल्या रामदेव बाबांना महिलांच्या पोषाखात असताना पोलिसांनी अटक केली होती.

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

“महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी ठाण्यात केले होते. या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं आहे.

बाबा रामदेव यांचं महिलांबद्दल वादग्रस्त विधान : रुपाली पाटील संतापल्या; म्हणाल्या, “अमृता फडणवीसांनी सणकन…”

दरम्यान, या प्रकरणानंतर रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रामदेव बाबांना राज्य महिला आयोगाने या वक्तव्यासंदर्भात नोटीस बजावली असून सोमवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे रामदेव बाबांनी जेव्हा हे विधान केलं, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसदेखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यामुळे राजकीय चर्चादेखील रंगू लागल्या आहेत. “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील १०० वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे तसाच आनंद तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे”, असं रामदेव बाबा म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc leader mahua moitra slammed yogguru ramdev baba on remark on womens clothing rvs
First published on: 27-11-2022 at 10:43 IST