तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी मायदेशी परतले. त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते. भारतात परतताच त्यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. “आज जगाला भारताविषयी जाणून घ्यायचं आहे”, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्याचं वर्णन केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जगाला लस दिली म्हणून विरोधकांनी माझ्यावर टीका केली. परंतु, मला त्यांना हे सांगायचं आहे की, ही बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे. आम्ही आमच्या शत्रूंचीही काळजी घेतो. आज जगाला जाणून घ्यायचं आहे की भारत काय विचार करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “तमिळ भाषा ही आपली भाषा आहे. ती प्रत्येक भारतीयाची भाषा आहे. ती जगातील सर्वांत जुनी भाषा आहे. मला पापुआ न्यू गिनीमध्ये थिरुक्कुरल या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे स्पष्ट केलं.

जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांचे दौरे करून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. यावेळी जे. पी. नड्डा आणि अमित शाह यांना त्यांना पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत केलं. मोदींचं कौतुक करताना जे. पी. नड्डा म्हणाले की, “जग तुमच्या प्रशासनाच्या मॉडेलचे कौतुक करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तुमचा ऑटोग्राफ मागितला. यावरून तुमच्या नेतृत्त्वाखाली जग भारताकडे कसे पाहते हे दिसून येते. पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानानी तुमच्या पायाला स्पर्श केला. तुमचा आदर केला. आपल्या पंतप्रधानांचे अशाप्रकारे स्वागत होत असल्याचे पाहून भारतातील लोकांना तुमचा अभिमान वाटतो.”

“जगभरातील महापुरुषांना भेटून मी त्यांच्यासोबत हिंदुस्तानच्या सामर्थ्याबाबत चर्चा करतो. माझ्या देशाच्या महान संस्कृतीचा गौरव करताना मी नजर खाली ठेवत नाही. मी डोळ्यांत डोळे घालून बोलतो. हे सामर्थ्य आहे म्हणून आपण पूर्ण बहुमत असलेले सरकार बनवलं आहे. जेव्हा मी बोलतो तेव्हा जगाला वाटतं की १४० कोटी लोक बोलत आहेत. जमेल तितका वेळ मी आपल्या देशाविषयीच बोलत होतो. भारतावर प्रेम करणारे लोक आज येथे जमले आहेत, मोदींवर प्रेम करणारे नाही “, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“तुम्ही सुद्धा हिंदुस्तानच्या संस्कृती, महान परंपरांविषयी बोलताना कधीच गुलामीची मानसिकता ठेवू नका. हिंमतीने बोला. जग ऐकण्यासाठी आतुर आहे. जेव्हा मी बोलतो की आमच्या तीर्थक्षेत्रावरील हल्ले स्वीकार्य नाहीत, तेव्हा जगसुद्धा मला साथ देतं. हिरोशिमाच्या धरतीवर ज्यावर मानसंहारची भयानक घटना घडली होती, तेथे जेव्हा महात्मा गांधींची प्रतिमा लागते तेव्हा शांतीचा संदेश संपूर्ण जगभर गर्वाने पोहोचवू शकतो,” असंही मोदी म्हणाले.

पापुआ न्यू गिनी या देशाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. पापुआ न्यू गिनीला जाण्याआधी मोदींनी जपानला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी जी७ प्रगत अर्थव्यस्थांच्या शिखल परिषदेला हजेरी लावली आणि जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today world wants to know what india is thinking pm modi lands in delhi after three nation visit sgk
First published on: 25-05-2023 at 08:56 IST