Trump Musk Fight News: गेल्या दोन आठवड्यांपासून अमेरिकेसह जगभरात अचानक चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प व एलॉन मस्क यांचं भांडण. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून त्या दोघांमधील मैत्री चर्चेत आली होती. निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन सरकारमध्ये एक स्वतंत्र विभाग तयार करून एलॉन मस्क यांच्याकडे त्याचं प्रमुखपद सोपवलं. त्यामुळे ट्रम्प-मस्क दोस्तीची चर्चा संपते न संपते तोच ती तुटल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावर आता एलॉन मस्क यांनी आपल्याला पश्चात्ताप होत असल्याचं म्हटलं आहे.

एलॉन मस्क यांनी काय पोस्ट केली?

गेल्या दोन आठवड्यांमध्ये एकमेकांवर भरपूर टीका केल्यानंतर आता एलॉन मस्क यांनी माघार घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आपण केलेल्या काही पोस्ट या चुकीच्या होत्या, असं मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. “गेल्या आठवड्यात मी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या पोस्टबद्दल मला पश्चात्ताप होत आहे. ते जरा अतीच झालं”, असं मस्क यांनी बुधवारी ११ जून रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे ट्रम्प-मस्क वाद?

दोन आठवड्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. तेव्हापासून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. आपणच मस्क यांना बाहेर पडण्यास सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. त्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या नव्या कर विधेयकावर टीका करणारी पोस्ट केली. हे विधेयक वाईट असल्याचं सांगताना विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या ट्रम्प यांच्या पक्षातील सिनेट सदस्यांविरोधात जाहीर भूमिका घेतली.

दरम्यान, ट्रम्प यांनी काही दिवसांनी एनबीसी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये एलॉन मस्क यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा दिला होता. सत्ताधारी पक्षाच्या सिनेट सदस्यांना विरोध करणाऱ्यांना मस्क यांनी आर्थिक पाठबळ दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. “जर त्यांनी हे करणं चालू ठेवलं, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. आता मस्क यांच्याशी जुळवून घेण्याचा कोणताही विचार नाही”, असं ट्रम्प यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं.

Epstain List चा दावा आणि वाद चिघळला

एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव एपस्टेन लिस्टमध्ये असल्याचा दावा एलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये केला होता. त्यावरूनदेखील दोघांमधील संबंध कमालीचे चिघळले. ट्रम्प यांचं नाव त्यात असल्यामुळेच अमेरिकन सरकारने यासंदर्भातील कागदपत्रे जाहीर होण्यापासून रोखून धरल्याचंही मस्क म्हणाले होते. त्यापुढच्या पोस्टमध्ये मस्क यांनी लवकरच यासंदर्भातील सत्य जगासमोर येईल, असाही दावा केला होता. पण दोन दिवसांपूर्वी या दोन्ही पोस्ट मस्क यांनी डिलीट केल्याचं दिसून आलं.