पीटीआय, पाटणा : Karnataka Elections 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता असल्याचे संकेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी दिले. संयुक्त जनता दलाचे (जदयू) प्रमुख असलेल्या नितीश कुमार यांनी सांगितले की, या बैठकीत विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीच्या निमित्ताने आम्ही नक्कीच एकत्र येऊ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या मुद्दय़ावर चर्चा करू.
नितीशकुमार यांनी सांगितले, की सध्या काही नेते कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. या निवडणुकीनंतर आम्ही आमच्या बैठकीचे ठिकाण निश्चित करू. विरोधी पक्षनेत्यांच्या पुढील बैठकीसाठी एकमताने पाटणा हे स्थळ निवडले तर ही बैठक येथेच होईल. येथे ही बैठक आयोजित करताना आम्हाला आनंदच होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २४ एप्रिल रोजी कोलकाता येथे नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. यावेळी ममतांनी नितीश यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी ऐक्याबाबत चर्चा करण्यासाठी पाटणा येथे सर्व भाजपेतर पक्षांची बैठक आयोजित करण्याचे आवाहन केले. ममता यांनी सांगितले, की मी नितीश कुमार यांना एकच विनंती केली आहे. जयप्रकाशजींच्या आंदोलनाची सुरुवात बिहारमधून झाली होती. अशा बिहारमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली तर आगामी वाटचालीची दिशा आपण निश्चित करू शकतो.
नितीश कुमार म्हणाले की, ममता यांनी पाटण्यात बैठक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही भाजपप्रणित केंद्र सरकारच्या विरोधात देशातील अधिकाधिक पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी अलीकडेच अनेक भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटलो. इतरही काही पक्षांशी मी चर्चा करणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट घडवून आणण्याचे माझे ध्येय आहे.
लालूप्रसाद-नितीशकुमार चर्चा
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव सात महिन्यानंतर बिहारमध्ये पाटण्याला परतले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांची भेट घेतली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी दोन हात करण्यासाठी हे दोन्ही नेते हातात हात घालून काम करणार असून, विरोधकांची आघाडी करण्यासाठीही प्रयत्न करणार आहेत. लालूप्रसाद यांचे पाटण्यात आगमन झाल्यानंतर काही तासांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा नितीशकुमार लालूप्रसाद आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी गेले.