US New Tariff Policy 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लावले आहे. तसेच रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इंधन खरेदी करत असल्याबद्दल भारताला दंड होणार असल्याचेही म्हटले आहे. एका बाजूला युरोपियन युनियन, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या सहकाऱ्यांशी स्वतःच्या मर्जीनुसार व्यापार करार केल्यानंतर ट्रम्प यांनी भारतावरील दबाव आणखी वाढवला आहे. पाकिस्तान, बांगलादेश यांच्यासह ५० देशांवर भारतापेक्षा कमी टॅरिफ लावले आहे. याचा भारतावर नेमका काय परिणाम होणार? कोणते क्षेत्र बाधित होणार? आणि असे निर्णय घेण्याचे कारण काय? हे पाहू.

व्यापार करार नसतानाही बांगलादेशला मदत

अमेरिकन बाजारात भारताचे स्पर्धक असलेल्या देशांवर कमी टॅरिफ लावल्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषतः कामगार केंद्रित आणि उच्च मूल्य असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते. बांगलादेशशी व्यापार करार नसतानाही अमेरिकेने त्यांच्यावर २० टक्के टॅरिफ लावला आहे. रेडिमेड गारमेंट क्षेत्रात बांगलादेश अमेरिकेसह, पाश्चिमात्य देशातील एक प्रमुख स्पर्धक आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले नवीन टॅरिफ धोरण ७ ऑगस्ट पासून लागू होणार आहे.

पाकिस्तानवर किती टॅरिफ?

अमेरिकेने पाकिस्तानशी व्यापार करार केलेला आहे. त्यांच्यावर १९ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी मागे घोषणा केल्याप्रमाणे, पाकिस्तानातील इंधन साठे विकसित करण्यासाठी ते एकत्रित काम करणार आहेत. मात्र पाकिस्तानने याआधी इंधन साठे शोधण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले आहेत.

इतर देशांना कमी टॅरिफ, भारताचा तोटा कसा?

ट्रम्प यांनी व्हिएतनामवर २० टक्के, तर मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सवर फक्त १९ टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे या देशांना भारताच्या तुलनेत अमेरिकन बाजारात अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.

बांगलादेश आणि पाकिस्तानवर कमी टॅरिफ लावल्यामुळे भारताच्या आरएमजी (रेडिमेड गारमेंट) क्षेत्रावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच व्हिएतनाम आणि मलेशियावर कमी आयात शुल्क लावल्यामुळे भारतात वेगाने वाढणाऱ्या नॉन-लेदर फुटवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भारताविरोधात ट्रम्प यांची नाराजी का?

व्हाइट हाऊसचे आर्थिक सल्लागार केविन हॅसेट यांनी बुधवारी सांगितले की, भारताबरोबर ज्या प्रकारे व्यापाराची चर्चा सुरू आहे, त्यावर ट्रम्प निराश आहेत. “भारताबरोबर सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटीच्या प्रगतीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निराश असल्याचे दिसते. त्यामुळेच २५ टक्के टॅरिफ लावल्यामुळे परिस्थिती सुधारेल आणि अमेरिकन लोकांचा त्यात फायदा होईल, असे त्यांना वाटत असावे”, अशी प्रतिक्रिया हॅसेट यांनी दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

Live Updates