Donald Trump On Tarrif : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची जगात चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर देखील २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. एवढंच नाही तर भारताकडून दंड वसूल करण्याचाही इशारा ट्रम्प यांनी दिला. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याच्या मुद्यांवरून डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक होत आहेत. यावरून ट्रम्प सातत्याने भारतावर आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची धमकी देत आहेत.

दरम्यान, आता ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा धमकी देत टॅरिफमध्ये आणखी मोठी वाढ करण्याचा इशारा दिला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्यांवरून ट्रम्प हे भारतावर टीका करत आहेत. आज पुन्हा याच मुद्यांवरून ट्रम्प यांनी भारतावर घणाघाती टीका केली आहे. तसेच पुढील २४ तासांत भारतावर पुन्हा अतिरिक्त कर लादण्याचा इशारा एका मुलाखतीत बोलताना दिला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“भारत हा एक चांगला व्यापारी भागीदार नाही. भारत आमच्याबरोबर व्यापार करतो. मात्र, अमेरिका भारताबरोबर व्यापार करत नाही. भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता मला वाटतं की, पुढील २४ तासांत भारतावर आणखी जास्त टॅरिफ आकारावं. कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, म्हणजेच युद्ध यंत्रणेला इंधन देत आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवला आरसा

ट्रम्प सातत्याने भारताला अतिरिक्त टॅरिफ लागू करण्याची धमकी देत आहेत. काही दिवसांपूर्वीच भारतावर २५ टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारला जाईल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. सोमवारी संध्याकाळी केलेल्या सोशल पोस्टमध्ये रशियाकडून भारत तेल खरेदी करतो म्हणून आणखी टॅरिफ आकारले जाईल, अशी नवी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर भारत सरकारने रशियाचंच उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ज्या रशियाचं नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावलं आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारतानं दिला आहे.

यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी संध्याकाळी उशीरा निवेदन जारी करण्यात आलं होतं. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून हे निवेदन शेअर केलं होतं. “युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रे रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहेत. पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उपलब्ध पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आले. त्यामुळेच भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली. त्यावेळी जागतिक स्तरावरील ऊर्जा बाजारपेठेतील समतोल टिकवण्यासाठी अशा प्रकारची आयात करण्यास अमेरिकेने भारताला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं होतं”, असं भारताने निवेदनात म्हटलं होतं.