West Bengal Leaders Attacked in Nagrakata : पश्चिम बंगालमधील पूरग्रस्त नागराकाटा परिसरातील लोकांची मदत करण्यासाठी, त्यांना अत्यावश्यक साहित्य वाटण्यासाठी गेलेले भाजपाचे नेते तथा मालदा मतदारसंघाचे खासदार खगेन मुर्मू यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांच्याबरोबर गेलेले आमदार डॉ. शंकर घोष यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाला आहे. दोन्ही नेत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार काही अज्ञात लोकांनी भाजपा नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. दोन्ही नेत्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दोन्ही नेते त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर व कार्यकर्त्यांबरोबर जीव मुठीत धरून तिथून निसटले. भाजपा नेते अमित मालविय यांनी या घटनेसंदर्भातील फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. यामध्ये खगेन मुर्मू रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहेत.
भाजपाने म्हटलं आहे की “मालदा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले व आदिवासी नेते खगेन मुर्मू यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला. ते पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले होते.
भाजपाची तृणमूल काँग्रेस व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका
भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. भाजपाने म्हटलं आहे की ममता बॅनर्जी कोलकाता कार्निव्हलमध्ये नृत्य करत आहेत, टीएमसी व राज्य सरकार बेपत्ता आहे. अशा स्थितीत जे लोक पूरग्रस्तांची मदत करत आहेत त्यांच्यावरच हल्ले केले जात आहेत. आम्ही मदतकार्य करू नये यासाठी हे हल्ले केले जात आहेत. हाच तृणमूल काँग्रेसचा बंगाल आहे. इथे क्रूरतेचा बोलबाला आहे. इथे दया दाखवणाऱ्यांना, मदत करणाऱ्यांना शिक्षा केली जाते.
केंद्र सरकार मदत करत नसल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप
दरम्यान, कोलकात्याहून बागडोगराला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “पूरामुळे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारकडे जी संसाधनेआहेत त्याच्या सहाय्याने आम्ही मदत करत आहोत. परंतु, केंद्राकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपाययोजना राबवण्यासाठी केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही.”
दरम्यान, उत्तर बंगालमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा कुटुंबियांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला होम गार्डची नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे.