PM Modi’s MAGA + MIGA = MEGA: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दोन दिवसांचा दौरा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी द्वीपक्षीय संबंधावर चर्चा केली. यावेळी त्यांनी ‘मागा + मिगा = मेगा’चा नारा दिला. यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या या नाऱ्याची चर्चा होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (MAGA – मागा) अशी घोषणा दिली होती. या घोषणेवरूनच पंतप्रधान मोदींनी “मेक इंडिया ग्रेट अगेन (MIGA – मिगा)” असा नवा नारा दिला. हे दोन्ही दृष्टीकोन एकत्र झाले तर त्याचे ‘मेगा’ (मोठ्या) दृष्टीकोनात रुपांतर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अमेरिकेतील लोक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेल्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन” या नाऱ्याशी परिचित आहेत. भारतातील लोकही वारसा आणि विकासाच्या मार्गावर ‘विकसित भारत – २०४७’ या स्वप्नाच्या दिशेने वेगाने अग्रेसर होत आहे. अमेरिकेच्या भाषेत सांगायचे झाल्यास विकसित भारताचा अर्थ “मेक इंडिया ग्रेट अगेन (MIGA – मिगा)” असा होतो. जेव्हा अमेरिका आणि भारत एकत्र येऊन काम करतात तेव्हा ‘मागा + मिगा = मेगा’ असे सूत्र तयार होते. भारत आणि अमेरिकेमधील ही मेगा भागीदारी आमच्या लक्ष्यांना एक नवा भवताल प्राप्त करून देतो.”

या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. य़ावेळी उद्योगपती गौतम अदाणी, अवैध स्थलांतरितांचा मुद्दा यासह अनेक विषयांवर पंतप्रधान मोदींनी आपली भूमिका मांडली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आज आम्ही द्वीपक्षीय व्यापारी संबंधांना २०३० पर्यंत दुपटीने म्हणजे ५०० अब्ज डॉलर्सने वाढिण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशातील टीम परस्परांना लाभदायक ठरतील असे सामंजस्य व्यापारी करार लवकरच करतील. भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इंधन आणि वायू व्यापाराला चालना देऊ. ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळकट करण्यात अमेरिका हा आमचा विश्वासू भागीदार आहे. आगामी काळात अमेरिकेचे नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे आमची क्षमता वाढवतील.”

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेचा दौरा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथे जागतिक नेते ठरले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांचीही भेट घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is miga maga mega what pm narendra modi says in his us visit kvg