राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अवघ्या दोन दिवसांनी राज्यात धक्कादायक घटना घडली आहे. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी (५ डिसेंबर रोजी) हत्या करण्यात आली आहे. तीन हल्लेखोरांनी जयपूरमध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हल्लेखोरांपैकी एकाचाही प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या श्याम नगर येथील गोगामेडी यांच्या घरी मंगळवारी दुपारी ही घटना घडली. गोळी लागल्यानंतर गोगामेडी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर १२ राउंड फायरिंग केल्याची समोर आली आहे.

VIDEO : राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांची हत्या, चार हल्लेखोरांनी घरात घुसून झाडल्या गोळ्या, परिसरात एकच खळबळ

“आज (मंगळवारी) तीन जणांनी गोगामेडी यांच्यावर त्यांच्या श्याम नगर येथील राहत्या घरी गोळ्या घातल्या. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोरही ठार झाला झाला. नवीन सिंह शेखावत असं मृत हल्लेखोराचं नाव आहे. गोगामेडींचा एक मित्र या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. तसेच गोगामेडी यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे,” असं जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितलं.

कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी?

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुखदेव सिंह गोगामेडी हे राजस्थानमधील राजपूत समाजाच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक होते. ते बराच काळ राष्ट्रीय करणी सेनेत होते. मात्र करणी सेना संघटनेतील वादानंतर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन केली होती. गोगामेडी त्याचे अध्यक्ष होते. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय होते, तसेच इन्स्टाग्रामवर त्यांचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.

राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षांवरील गोळीबाराचा CCTV व्हिडीओ समोर, शेजारीच बसलेले हल्लेखोर; अन् अचानक…

‘पद्मावत’ चित्रपटाला गोगामेडींनी केला होता विरोध

२०१७ मध्ये जयगडमध्ये दीपिका पदुकोणच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजपूत करणी सेनेच्या लोकांनी तोडफोड केली होती. ‘पद्मावत’ चित्रपट आणि गँगस्टर आनंदपाल एन्काउंटर प्रकरणानंतर राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनामुळे गोगामेडी प्रसिद्धीच्या झोतात आले होते.

अंडरवर्ल्डच्या दहशतीपुढे सेन्सॉरने गुडघे टेकले, करणी सेनेचा आरोप

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना गोगामेडींनी मारलेली थप्पड

सुखदेव सिंह गोगामेडी यांनी बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना ‘पद्मावत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर थप्पड मारली होती. सुखदेव सिंग गोगामेडी यांनी या चित्रपटाला खूप विरोध केला होता. या चित्रपटाचे नाव ‘पद्मावती’ ठेवण्यात आले होते, पण राजपूत करणी सेनेच्या विरोधानंतर निर्मात्यांना चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ ठेवावे लागले होते. तसेच अनेक दृश्येही चित्रपटातून हटवली गेली होती. या चित्रपटाला केलेल्या विरोधानंतरच सुखदेव सिंह गोगामेडी राजपूत समाजातील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते.

‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित झाल्यास तोडफोड करण्याची दिली होती धमकी

‘पद्मावती’ चित्रपटाला गोगामेडी व त्यांच्या संघटनेने खूपच विरोध केला होता. सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रमाणित केल्यावरही गोगामेडींनी टीका केली होती. “अंडरवर्ल्डच्या दहशतीपुढे सेन्सॉर बोर्डाने गुडघे टेकले, त्यामुळे ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रमाणित करण्याचा निर्णय घेतला गेला. चित्रपटाला असणारा विरोध कायम असून ज्या चित्रपटगृहांमध्ये ‘पद्मावती’ प्रदर्शित केला जाईल तिथे करणी सेनेचे कार्यकर्ते तोडफोड करतील”, असा इशारा गोगामेडी यांनी दिला होता.

गोगामेडी यांनी भाजपाकडे निवडणुकीत मागितले होते तिकीट

सुखदेव सिंह गोगामेडी यांनी २०१८ मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत हनुमानगड जिल्ह्यातील भादरा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मागितले होते. मात्र भाजपने सुखदेव सिंह यांना तिकीट दिले नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was sukhdev singh gogamedi of shri rashtriya rajput karni sena shot dead in jaipur hrc