नवी दिल्ली : ‘ओमानबरोबर प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला लवकरच मूर्त रूप देण्यात येईल. कतारलाही भारताबरोबर करार करण्याची इच्छा आहे. साऱ्या जगाला भारताबरोबर व्यापार वाढविण्याची इच्छा आहे,’ अशी माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिली.

गोयल म्हणाले, ‘भारताने अनेक विकसित देशांशी असे करार केले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब आमिराती, मॉरिशस आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटनेचा समावेश आहे. याखेरीज भारताची युरोपीय संघ, अमेरिका, न्यूझीलंड, चिली, पेरू या देशांशी करार करण्यासाठी चर्चा सुरू आहे. हे करार नव्या संधी तयार करतील. युरोपीय संघाशी चर्चा वेगाने सुरू आहेत. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल ब्रुसेल्स येथे पुढील आठवड्यात जाणार आहेत.’

अमेरिकेबरोबर द्विस्तरावरील व्यापार करारावरील चर्चा सुरू आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान पूर्ण होईल, असे नियोजन आहे. या करारांमुळे नव्या संधी निर्माण होतील. – पीयूष गोयल, वाणिज्यमंत्री

 ‘निर्यातीला चालना देण्यासाठी विविध उपाय लवकरच’ नवी दिल्लीः ‘निर्यातीला चालना देण्यासाठी विविध उपायांची घोषणा सरकार लवकरच करील. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात निर्यातदारांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. अमेरिकेने करात वाढ केल्यामुळे ज्या क्षेत्रांवर परिणाम होत आहे, अशा क्षेत्रांची नावे उद्योगविश्वाने द्यावीत. आपल्या दूतावासांच्या माध्यमांतून विविध देशांमध्ये आपण नव्या संधी शोधत आहोत. स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढविण्यासाठीही आपण प्रयत्न करीत आहोत,’ असे गोयल म्हणाले.