Jagdeep Dhankhar Absence From Public Life: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याशी संबंधित लोकसभेत सादर केलेल्या विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे आणि म्हटले आहे की हे विधेयक देशाला शतकानुशतके जुन्या काळात घेऊन जाणार आहे. यादरम्यान, त्यांनी देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील अनुपस्थितीबद्दलही सरकारला प्रश्न विचारला आहे.

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या सत्कार समारंभात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, धनखड यांच्या राजीनाम्यामागे एक गोष्ट आहे. “जुने उपराष्ट्रपती कुठे गेले? ते का लपून बसले आहेत?” असे प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “त्यांच्या राजीनाम्यामागे एक मोठी गोष्ट आहे. तुमच्यापैकी काहींना ती माहित असेल, काहींना कदाचित माहित नसेल. पण त्यामागे एक गोष्ट आहे. भारताचे माजी उपराष्ट्रपती अशा परिस्थितीत का आहेत, जिथे ते एक शब्दही बोलू शकत नाहीत आणि त्यांना लपून बसावे लागत आहे.”

राहुल गांधींनी नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले, “भारताचे माजी उपराष्ट्रपती का लपून बसले आहेत? अशी परिस्थिती का आली आहे की ते बाहेर येऊन एक शब्दही बोलू शकत नाहीत? कल्पना करा की आपण कोणत्या काळात जगत आहोत.”

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत?

भारताचे १४ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात आरोग्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्याकडून कोणतेही सार्वजनिक विधान आलेले नाही किंवा त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला नाही, त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबद्दल विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी असे समोर आले आहे की माजी उपराष्ट्रपती सध्या उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी आहेत.

१३० व्या घटना दुसस्ती विधेयकावर टीका

तत्पूर्वी, कार्यक्रमात बोलताना, राहुल गांधी यांनी १३० व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून सरकारला लक्ष्य केले. ते म्हणाले की, भाजपाचे हे विधेयक आपल्याला मध्ययुगीन काळात परत घेऊन जाणारे विधेयक आहे. राहुल गांधी म्हणाले, “भाजप आणत असलेल्या नवीन विधेयकाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. आपण मध्ययुगीन काळात परत जात आहोत, जेव्हा राजा त्याच्या इच्छेनुसार कोणालाही काढून टाकू शकत होता. निवडणुकांची कोणतीही संकल्पना नव्हती. त्यांना तुमचा चेहरा आवडला नाही, तर ते ईडीला गुन्हा नोंदवण्यास सांगतील आणि नंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या व्यक्तीला ३० दिवसांच्या आत काढून टाकले जाईल.”