भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अनेक महिला कुस्तीपटू तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. या प्रकरणात आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. त्यांनी एक ट्वीट करत थेट सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला प्रश्न केला आहे.
काय आहे जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट?
अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा हे आणखी दोन ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर मुलींच्या लैंगिक छळवणूक विरोधातील आंदोलनात आज रस्त्यावर उतरले. पण सरकार खा. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. तेंडुलकर, कोहली काही बोलतात का पाहू? सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आत्ताच बातमी आली. कपिलदेव ह्या भगिनीन साठी उभा राहिला. असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
या ट्वीटनंतर आता सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे काही उत्तर देणार का? किंवा काही भूमिका घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या तिघांसमवेत मोठ्या संख्येनं कुस्तीपटू जंतरमंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
नीरज चोप्राचं ट्वीट
नीरज चोप्रानं महिला कुस्तीपटूंना पाठिंबा देणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यानं कुस्तीपटूंना द्यावा लागणारा लढा पाहून वेदना होत असल्याचं नीरज चोप्रानं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “आपले अॅथलिट रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत असल्याचं पाहून मला वेदना होत आहेत. आपल्या महान देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि देशाला गर्व वाटण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत”, असं नीरज चोप्रानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अभिनव बिंद्राने काय म्हटलं आहे?
अभिनव बिंद्रानेही या प्रकरणात महिला कुस्तीपटूंना साथ दिली आहे. एक अॅथलिट म्हणून त्या सर्व महिला कुस्तीपटू प्रत्येक दिवशी मेहनत घेत असतात. आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करतात. मात्र अशा कुस्तीगीर महिलांचं लैंगिक शोषण होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. या महिला पहिलवानांना न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे या आशयाचं ट्वीट अभिनव बिंद्राने केलं आहे.
विनेश फोगाटने काय म्हटलं आहे?
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा न देण्यासाठी इतर खेळाडूंना कसली भीती वाटतेय? असा प्रश्नही विनेश फोगाटनं उपस्थित केला आहे. “मी आणि बजरंग पुनियानं अनेक खुली पत्रं लिहिली, व्हिडीओ पोस्ट केले ज्यात इतर खेळाडूंना बोलण्याची विनंती केली होती. पण त्यांना नेमकी कशाची भीती वाटतेय हे आम्हाला माहिती नाही. मी समजू शकते की त्यांना स्पॉन्सरशिप गमावण्याची किंवा ब्रँड एंडॉर्समेंटचे करार मोडण्याची काळजी असेल. कदाचित त्यामुळेच त्यांना आंदोलन करणाऱ्या खेळाडूंशी नाव जोडलं जाण्याची भीती असेल. पण त्याचं मला दु:ख होतंय”, अशा शब्दांत विनेश फोगाटनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.