Uday Singh On Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने २०२ जागा जिंकत मोठं बहुमत मिळवलं, तर या निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव झाला. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्षालाही बिहारच्या जनतेने मोठा धक्का दिला. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. दरम्यान, बिहार निवडणुकीच्या निकालावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, असं असतानाच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने एक गंभीर आरोप करत बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
‘बिहारच्या निवडणुकीत जागतिक बँकेचा १४ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला गेला आहे’, असा गंभीर आरोप जनसुराज पक्षाने केला आहे. जनसुराज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत घेत या संदर्भातील भाष्य केलं. तसेच बिहारच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर प्रशांत किशोर खरंच राजकारण सोडणार का? अशा चर्चा सुरू आहेत. यावरही उदय सिंह यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
उदय सिंह यांनी काय आरोप केले?
विकास प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आलेले १४ हजार कोटी रुपयांचा जागतिक बँकेचा निधी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी १०,००० रुपये देण्यासाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे याचा निवडणुकीत मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पैशाचा गैरवापर आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न झाला असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जनसुराज पक्षाच्यावतीने उदय सिंह यांनी केली आहे.
उदय सिंह यांनी म्हटलं की, “या निवडणुकीत २१ जूनपासून मतदानाच्या दिवसापर्यंत हा जनादेश मिळवण्यासाठी जवळजवळ ४०,००० कोटी रुपये खर्च करण्यात आले. जनतेच्या पैशांचा वापर करून एनडीएने लोकांची मते खरेदी केली. जागतिक बँकेकडून मिळालेल्या निधीचा वापर यामध्ये करण्यात आल्याचं मला कळलं आहे,” असा आरोप उदय सिंह यांनी केला आहे.
जनसुराज पक्षाचे प्रवक्ते पवन वर्मा यांनी म्हटलं की, “राज्याची तिजोरीतील रक्कम आता संपली आहे. आमच्याकडे अशी माहिती आहे की, राज्यातील महिलांना देण्यात आलेली १०,००० रुपयांची रक्कम जागतिक बँकेकडून दुसऱ्या विकासाच्या प्रकल्पांसाठी घेण्यात आलेली होती. पण त्यामधूनच निवडणुकीच्या आचारसंहितेच्या एक तास आधी १४ हजार कोटी रुपये काढून राज्यातील १.२५ कोटी महिलांना वाटण्यात आले आहेत”, असा आरोप वर्मा यांनी केला.
