Trump-Putin Meeting Welcomed By India: शनिवारी भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का शिखर परिषदेचे स्वागत केले आणि त्यांचे शांततेचे प्रयत्न “अत्यंत कौतुकास्पद” असल्याचे म्हटले आहे.
“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का शिखर परिषदेचे भारत स्वागत करतो. त्यांचे शांततेचे प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत”, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
यावेळी या निवदेनात परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी राजनैतिकतेचे महत्त्व अधोरेखित केले. “भारत शिखर परिषदेत झालेल्या प्रगतीचे कौतुक करतो. पुढे जाण्याचा मार्ग केवळ संवाद आणि राजनैतिक मार्गानेच असू शकतो. जगाला युक्रेनमधील संघर्षाचा लवकर अंत पाहायचा आहे”, असे निवेदनात म्हटले आहे.
भारतासाठी दिलासादायक म्हणून पाहिले जात असलेल्या या शिखर परिषदेत, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की ते रशिया आणि त्यांच्या व्यापारी भागीदारांवर अतिरिक्त निर्बंध लादण्याचा तात्काळ विचार करत नाहीत. पण, ट्रम्प यांनी असे प्रतिपादन केले की त्यांना “२-३ आठवड्यांत” यावर पुनर्विचार करावा लागू शकतो.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, ट्रम्प यांनी युक्रेन युद्धावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रशियाबद्दलची आपली भूमिका मवाळ केली आणि अलास्का शिखर परिषद “चांगली झाली” असे म्हटले आणि त्याला दहा पैकी दहा गुण दिले.
“मला दोन-तीन आठवड्यांत निर्बंधांबद्दल विचार करावा लागू शकतो, परंतु आपल्याला त्याबद्दल लगेच विचार करण्याची गरज नाही”, असे काही दिवसांपूर्वी रशियाविरुद्ध आक्रमक सूर स्वीकारणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील हाय-प्रोफाइल अलास्का शिखर परिषद शुक्रवारी युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कोणत्याही कराराशिवाय संपली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांची आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची काल आलास्कामध्ये पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यासोबत उभे राहून, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले की, २०२० च्या निवडणुकीनंतर ट्रम्प जर व्हाइट हाऊसमध्ये राहिले असते, तर युक्रेनमधील युद्ध सुरूच झाले नसते, असे त्यांना वाटते.
“आज, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की जर ते २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष असते, तर युद्ध झालेच नसते आणि मला खात्री आहे की हे खरे आहे. मी याला दुजोरा देऊ शकतो”, असे पुतिन म्हटल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.