Dhruv Rathee on Bihar Election Result: बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी विरोधी पक्षांना जोरदार झटका दिला आहे. सत्ता स्थापनेचा विचार करून आक्रमक पद्धतीने निवडणूक लढविणाऱ्या विरोधकांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करून दाखवता आलेली नाही. भाजपाप्रणीत एनडीए आघाडीने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत बिहारवर एकहाती विजय मिळवला आहे. या विजयानंतर विरोधकांसह अनेकांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकजण निवडणुकीत गडबड झाल्याचा संशय व्यक्त करत आहेत.

कॉमेडियन कुणाल कामराने शुक्रवारी निकाल लागत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना चिमटा काढणारी पोस्ट केली होती. त्यानंतर लोकप्रिय युट्यूबर ध्रुव राठी यानेही निवडणूक आयोगावर कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच विरोधकांना एक सल्ला दिला आहे.

शुक्रवारी निवडणुकीचा निकाल लागत असताना सुरुवातीच्या काही तासातच एनडीएने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केल्याचे चित्र दिसले. त्यानंतर भाजपाच्या वतीने देशभरात जल्लोष साजरा केला जाऊ लागला. ध्रुव राठीने पहिल्या पोस्टमध्ये जल्लोषावर टीका केली. “देशातील अर्ध्या लोकसंख्येला ही फसवणूक असल्याचे माहीत आहे, मग विजयाचा जल्लोष करण्यात काय अर्थ आहे”, असे ध्रुव राठीने म्हटले.

यानंतर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले. दुसऱ्या पोस्टमध्ये तो म्हणाला, मार्च २०२४ मध्ये ज्ञानेश कुमार यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर जे झाले, तो इतिहास आहे.

यूट्यूबर ध्रुव राठीची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका.

विरोधकांना दिला सल्ला

दरम्यान ध्रुव राठीने विरोधकांना एक सल्ला दिला आहे. तिसऱ्या पोस्टमध्ये ध्रुवने म्हटले, “प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास विरोधी पक्षांनी आता निवडणुकीवरच बहिष्कार टाकायला हवा. एसआयआर आणि वोट चारीनंतर काय झाले, हे आधीच तुम्हाला माहीत आहे. महात्मा गांधीपासून काहीतरी शिकायला हवे.”

विशेष म्हणजे फक्त ध्रुव राठीच नाही तर निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. कॉमेडियन कुणाल कामराने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “ज्ञानेश कुमार यांना नेपाळला पाठवा. तिथेही भाजपाचे सरकार स्थापन होईल.”

राहुल गांधी यांनीही एनडीएच्या प्रचंड विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “बिहारचा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. आम्ही एका अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल.”