इतर सजीव प्राणी जसे इतरांपासून स्वतःचे रक्षण करत असतात, त्याचप्रमाणे बुरशीच्या अनेक प्रजातींमध्येदेखील स्वरक्षणासाठी विषारी पदार्थ उपलब्ध असतात. इतरांप्रमाणेच, मशरूमनेही स्वतःचे रक्षण करून, स्वतःला जिवंत ठेवून आपली प्रजाती पुढे नेण्याचे, पुनरुत्पादन करण्याचे तंत्र शिकून घेतले आहे.

मशरूमचे प्रजनन कसे होते?

मशरूम पुनरुत्पादन करण्यासाठी जमिनीच्या अगदी काही भाग वर येऊन बीजाणे सोडण्यासाठी वर येत असतात. मात्र असे करत असताना, या वनस्पतींना इतर जीवांपासून धोका असून, त्यांपासून बचावासाठी प्राण्यांप्रमाणे ते पळून जाऊ शकत नाहीत.

मशरूम्सना आपले बीजाणू वातावरणात सोडण्यासाठी फारच कमी कालावधी असतो. अशात त्यांना जर इतर जीवांनी खाऊन टाकले तर त्यांच्या बीजाणूंचा प्रसार होणार नाही. अर्थात, यालादेखील अपवाद आहे. मशरूम्सच्या काही प्रजातींच्या बीजांचे प्रसारण हे प्राण्यांनी खाऊन उत्सर्जित केल्यावरच होत असते. घातक पदार्थ किंवा विषारी घटक मशरूम्सचे रक्षण करण्यास उपयुक्त पडते. कालांतराने प्राण्यांनादेखील कोणते मशरूम्स खाण्यायोग्य आहेत आणि कोणते मशरूम हे विषारी आहेत हे समजू लागले.

हेही वाचा : माशाच्या झोपेचा सबंध मानवाच्या स्वप्नांशी असतो का? मासे पाण्यात कसे झोपतात? घ्या जाणून….

मात्र, बऱ्याचदा अपुऱ्या माहितीमुळे विषारी मशरूम्सनादेखील खाण्यालायक मशरूम समजण्याची चूक केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर भटकंतीसाठी, ट्रेकसाठी कुठल्या जंगलात जाणार असल्यास तुमच्याकडून अशी चूक होऊ नये, यासाठी कोणते मशरूम्स विषारी असतात, याची साधी माहिती असणे आवश्यक आहे.

विषारी मशरूम / भूछत्रांची माहिती पाहा

१. डेथ कॅप [Death cap -Amanita phalloides]

अतिशय विषारी स्वभाव असणाऱ्या या मशरूम्ससाठी अगदी त्याला साजेसं नाव देण्यात आले आहे. साधारण ओक वृक्षाजवळ किंवा जंगल असणाऱ्या भागांमध्ये आढळणारे हे मशरूम्स सर्वात घातक अशा विषबाधेसाठी कारणीभूत असतात. हे मशरूम्स आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या सीझरच्या मशरूमसारख्या प्रजातींसारखे दिसतात, त्यामुळे अनेकदा हा बुरशी प्रकार ओळखण्यात गोंधळ होऊ शकतो. विशेष म्हणजे या जीवघेण्या मशरूम्सची चवदेखील चांगली असते. मात्र, याच्या सेवनाने यकृत, किडनी निकामी होऊन एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे मशरूम्स दिसल्यास चार हात लांब राहणे उत्तम ठरू शकते.

२. डिस्ट्रॉइंग एंजल्स [Destroying angels – Amanita bisporigera]

पांढऱ्या रंगाचे डिस्ट्रॉइंग एंजल्स नावाचे भूछत्र किंवा मशरूम्स हे जंगल किंवा गवताळ कुरणामध्ये आढळतात. डेथकॅपप्रमाणेच मशरूम्सच्या या प्रजातींमध्ये ॲमॅटॉक्सिन नावाचे घटक आढळतात. ॲमॅटॉक्सिन हा अत्यंत विषारी घटक असून, ते धमन्यांमध्ये जाऊन चयापचय प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण करतात. यकृत, हृदय आणि इतर अनेक अवयवांचे नुकसान करतात. अतिशय कमी प्रमाणात म्हणजे, केवळ अर्धे डिस्ट्रॉइंग एंजल्सचे सेवन केले तरीही सेवन कारणाऱ्यांचा मृत्यू होऊ शकतो.

हेही वाचा : शाही स्वयंपाक करणाऱ्या ‘शेफ’ला पूर्वीच्या काळी ‘महाराज’ का म्हटले जायचे? जाणून घ्या ही माहिती

३. कॉमन कोनकॅप [Common conecap – Pholiotina rugosa]

लालसर चॉकलेटी रंगाचे कॉमन कोनकॅप नावाचे मशरूम हे सामान्यतः प्रशांत महासागरासह युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेतही आढळतात. त्यांच्या शंकू आकारामुळे अनेकदा त्यांना सायलोसायब किंवा मॅजिक मशरूम समजण्याची चूक होऊ शकते.

या कॉमन कोनकॅप मशरूमचे सेवन केल्याने साधारण सहा ते २४ तासांनंतर जठरासंबंधी समस्या जाणवण्यास सुरुवात होऊ शकते, ज्याला अनेकदा फूड पॉइजनिंग म्हणजेच अन्नातून झालेली विषबाधा असे समजले जाते. परंतु, त्याचा प्रभाव यकृतावर होऊन यकृत निकामी होऊ शकते आणि काही वेळेस जीव गमावण्याचा धोका निर्माण होतो.

४. फ्लाय ॲगारिक [Fly agaric – Amanita muscaria]

मशरूम्सच्या जगात लाल रंगाचे फ्लाय ॲगारिक मशरूम्स हे प्रचंड विषारी मशरूम्स असल्याचे बहुतांश लोकांना माहीत असते. लाल रंगाच्या या मशरूमवर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. या मशरूम्सचे चित्र बहुतेकदा लहान मुलांच्या गोष्टीच्या किंवा चित्रांच्या पुस्तकात असल्याचे पाहायला मिळते. इतकेच नाही तर या मशरूम्सची ओळख अनेकांना सुप्रसिद्ध व्हिडीओ गेममधूनही झालेली आहे. विदेशात अनेकदा या भूछत्राचा संबंध हा काल्पनिक जग, जादुई प्राणी, पऱ्यांशी जोडला जातो.

आकर्षक रंगरूप असणारे हे मशरूम मात्र चांगलेच विषारी असतात. या मशरूम्समध्ये अनेक बायोएक्टिव्ह संयुगं आणि सायकोएक्टिव्ह घटक असतात. इतर विषारी मशरूम्सच्या तुलनेत ते जीवघेणे नसले तरीही या फ्लाय ॲगारिक मशरूमच्या सेवनाने बऱ्याच प्रमाणात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु, या मशरूमच्या सेवनानंतर कोणतीही निश्चित अशी लक्षणे दिसून येत नाहीत. बुद्धिभ्रष्टतेपासून भास होण्यापर्यंत ते फेफरे आणि कोमापर्यंतची कोणतीही लक्षणे व्यक्तीमध्ये दिसू शकतात.

५. ब्राऊन रोल-रिम [Brown roll-rim Paxillus involutus]

खरंतर ब्राऊन रोल-रिम हा मशरूमचा प्रकार १९४० सालापर्यंत मध्य आणि पूर्व युरोपमध्ये शिजवून खाण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध होता. मात्र, वर्ष १९४४ मध्ये जर्मन मायकोलॉजिस्ट ज्युलियस शेफर यांच्या मृत्यूसाठी ही ठराविक मशरूम्स कारणीभूत असल्याचे समोर आले.

मायकोलॉजिस्ट ज्युलियस शेफर यांनी सतत या रोल-रिम मशरूमचा जेवणामध्ये वापर केला होता. या मशरूमचा सतत जेवणात वापर केल्याने त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होतात. शरीर स्वतः लाल रक्तपेशींवर हल्ला करतात, ज्याचा परिणाम हा मूत्रपिंडावर होऊन ते निकामी होण्याचा धोका संभवतो. श्वसनाचा त्रास निर्माण होऊ शकतो; व्यक्ती जीवदेखील गमावू शकतो. अशी सर्व माहिती बीबीसीच्या लेखावरून समजते.

त्यामुळे जंगलात भटकंती करण्यासाठी जाणार असल्यास, माहिती नसलेल्या वनस्पतींना खास करून मशरूमसारख्या बुरशीच्या प्रजातींना हात न लावणे फायद्याचे ठरू शकते.