Peshwai Water System In Pune : पाणी हे माणसाची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय माणसाचे आयुष्य नाही. महापालिका, नगरपालिका आपल्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पाइपलाईन व्यवस्था करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, साधारण अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी पुण्यात एक अशी पाईपलाईन बांधली गेली होती, जे पाणी थेट कात्रजच्या तलावातून शनिवारवाड्याच्या हौदापर्यंत यायचं आणि तेही जमिनीखालून. ही स्तुत्य कल्पना कोणाची होती? आणि या भुयारी नळयोजनेविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊ या.

भुयारी नळयोजनेची कल्पना कोणाची होती?

पूर्वीच्या काळी निजामशाहीत मोगलाईत पाण्याच्या व्यवस्थेसाठी नळयोजना राबवल्या जायच्या. त्याला ‘नहर’ असं म्हणत. त्याचदरम्यान नानासाहेब पेशवे यांनी ‘नहर-ए-कात्रज’ ही अभिनव नळयोजना आखली. पुण्याच्या दक्षिणेस डोंगर रांगेत कात्रज गावाजवळ दोन छोटे ओढे एकत्र येत होते. या प्रवाहांना अडवून कात्रजच्या डोंगरात एक बंधारा बांधायचा आणि कृत्रिम तलाव निर्माण करायचा, अशी ही योजना होती. १७४९ साली पहिले धरण जरा उंचीवर बांधले. सहाशे फूट लांबीची आणि आठ फूट रुंदीची भक्कम दगडी भिंत बांधताना ठराविक उंचीवर भोके ठेवून, ती दट्टे मारून बंद केली होती.
धरण बांधून झाल्यानंतर त्यात साठणारे पाणी पुण्यात येईपर्यंत स्वच्छ राहावे, म्हणून याच धरणाच्या खालच्या पातळीवर १७५५ ते १७५७ या काळात दुसरे मोठे धरण बांधले. हा तलाव पहिल्या तलावापेक्षा जास्त मोठा होता आणि त्यात पाणीही भरपूर साठत होते. हे दुसरे धरण म्हणजेच कात्रजचा मुख्य तलाव होय.

ही नळयोजना कशी आखली गेली?

कात्रजपासून सुरू झालेली ही नळयोजना अत्यंत तंत्रशुद्ध होती. पादचारी रस्ता, त्याखाली मातीचा भराव आणि त्याखाली ही पाईपलाईन होती. ही पाईपालाईन अडीच ते तीन फूट रुंद, पाच ते सात फूट किंवा काही ठिकाणी बारा फुटांपर्यंत उंच अशी होती. संपूर्ण पाईपलाईन घडीव दगडांनी बांधलेली होती. या संपूर्ण लांबीच्या नळाला प्रत्येक ३० मीटर अंतरावर किंवा जागेप्रमाणे वळणांवर उच्छ्वास बांधलेले होते. पाण्याच्या पातळीखाली सात-आठ फूट खोलीची एक विहीर होती. वेगाने वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ या खोल विहिरीत खाली साठायचा व स्वच्छ पाणी पुढे जायचे. बऱ्याच ठिकाणी या उच्छ्वासाकडेला भिंत बांधून पाणी अडवलेले असून, थोड्या उंचीवर सहा इंच व्यासाची भोके ठेवली होती. स्वच्छ झालेले पाणी साठून उंचावरून पुन्हा नळात पडावे, यासाठी ही व्यवस्था आहे.

असा मिळाला पुण्याला बारा महिने चोवीस तास अखंड पाणी पुरवणारा स्रोत

कात्रजपासून सुरू होणारा नळ ओढ्याच्या पूर्वेने, सारसबागेच्या शेजारून, अभिनव चौकातून टेलिफोन भवनपर्यंत बांधला. नातूबाग, चिंचेच्या तालमीशेजारून गावात आणला गेला. ज्या ठिकाणी पाणी वापरायचे, त्या ठिकाणी दगडी हौद बांधून पाणी साठविण्याची व्यवस्था केली होती, त्यामुळे अनेक खाजगी वाड्यांमध्ये आजही तुम्हाला असे हौद बांधलेले दिसतील. त्याशिवाय बदामी हौद, काळा हौद, फडके हौद यांसारखे अनेक हौदही याच काळात बांधले गेले. हे हौद म्हणजे पुणेकरांसाठी फार मोठा दिलासा होता, यामुळे पुण्याला बारा महिने चोवीस तास अखंड पाणी पुरवणारा स्रोत निर्माण झाला होता.

शनिवार पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, गुरुवार पेठ इत्यादी पेठांमध्ये ही नळयोजना आजही जमिनीखाली अस्तित्वात आहे. १७५७ साली जवळपास आठ किलोमीटरची भुयारी नळयोजना आखणे, ही खरोखर छोटी गोष्ट नव्हती. त्यामुळे ही नळयोजना आजही आदर्श मानली जाते.