India’s Last Railway Station: देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं रेल्वे नेटवर्क आहे. देशभरात दररोज सुमारे १३ हजारांहून अधिक गाड्या धावतात. ७,००० पेक्षा अधिक रेल्वेस्थानकं आहेत आणि ६८,००० किलोमीटरहून अधिक लांबीचं रेल्वे नेटवर्क आहे. भारतात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे हा भारतीयांसाठी दळणवळणाचा सर्वांत मोठा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्यामुळे अनेक जण रेल्वेला जास्त प्राधान्य देतात. पण, या सर्व गर्दीच्या आणि गजबजलेल्या रुळांमध्ये एक असं स्थानक आहे, जे पूर्णपणे शांत आहे. कारण- तिथे कुठलीही प्रवासी गाडी थांबतच नाही.
हे स्थानक भारताच्या रेल्वे इतिहासात ‘अंतिम’ मानलं जातं; पण येथे आता केवळ स्मशानवत शांतता असते. तेथे इतर रेल्वेस्थानकांप्रमाणे ना तिकीट खिडक्या उघडतात, ना लोकांचा गोंगाट, ना गाड्यांच्या शिट्या. एकेकाळी गजबजलेलं हे स्थानक आज केवळ आठवणींचा धूर कवटाळताना दिसतंय. हे स्थानक आजही भारतात आहे; पण तिथं कुठलीही तिकीट खिडकी सुरू असल्याचे दिसत नाही, ना कोणतेही प्रवासी. प्लॅटफॉर्मवर केवळ शुकशुकाट आणि क्वचित दिसणारे कर्मचारी. जेव्हा ब्रिटिश भारतावर राज्य करत होते, तेव्हा हे स्थानक अत्यंत महत्त्वाचं होतं. ब्रिटिशांच्या काळात उभारलेलं हे स्थानक कोलकाता आणि ढाकामधील महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर होतं. कोलकाता आणि ढाका यांच्यातील रेल्वेमार्गावरचं हे एक प्रमुख स्थानक मानलं जायचं. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांसारख्या थोर नेत्यांनीही या स्थानकावरून प्रवास केला आहे.
स्वातंत्र्यानंतर आणि १९७१ मध्ये बांगलादेश निर्माण झाल्यानंतर या स्थानकाचं स्वरूप बदललं. १९७८ मध्ये भारत आणि बांगलादेशदरम्यान मालगाड्यांसाठी करार झाला. मग २०११ मध्ये नेपाळच्या मालवाहतूक सुलभीकरणासाठी या स्थानकाला आणखी महत्त्व दिलं गेलं. त्यामुळे आजही या स्थानकावरून मालगाड्या धावतात; पण या स्थानकाने प्रवासी गाड्यांना येण्यास आपले दरवाजे कायमचेस्वरूपी बंद केले आहेत.
कधी काळी दार्जिलिंग मेलच्याआवाजानं गजबजलेलं हे स्थानक, आज निवांत, शांत आणि विस्मरणात गेलेलं आहे. या स्थानकाचं ऐतिहासिक महत्त्व असूनही, सामान्य जनतेला त्याच्या अस्तित्वाची कल्पनाही नाही. हे स्थानक भारताच्या सीमारेषेवर असून, जिथे भारत संपतो आणि बांगलादेश सुरू होतो; अशा जागी ते स्थित आहे. आता या स्थानकावर एक फलक लावलेला आहे. ‘भारताचं अंतिम रेल्वेस्थानक.’
तर, हे गूढ आणि विस्मरणात गेलेलं शेवटचं रेल्वेस्थानक म्हणजे सिंहाबाद. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील, जे भारतातलं ‘अंतिम’ रेल्वेस्थानक मानलं जातं.