भारतीय रेल्वेचे जाळे खूप मोठे आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील चौथ्‍या क्रमांकाचे नेटवर्क आहे. रेल्वेचा प्रवास हा सोपा आणि स्वस्त मानला जातो. म्हणूनच दैनंदिन जीवनात प्रवासासाठी भारतातील लोकांचा कल रेल्वेकडे असतो. आपल्यापैकी बहुतेकांनी रेल्वेने प्रवास केला असेल. प्रवासादरम्यान, आपल्याला गाड्या, तसेच फलाटांवर लिहिलेली अनेक अक्षरे, संख्या, चिन्हे आढळतात. भारतीय रेल्वेच्या लोकोमोटिव्ह किंवा ट्रेन इंजिनावर WAG, WAP, WDM, WAM आदी इंग्रजी कोड स्वरूपातील अक्षरे तुम्ही पाहिली असतीलच. पण, त्या एकत्रित लिहिलेल्या अक्षरांचा अर्थ काय असेल, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? तुमच्यासमोर असलेली गाडी एक्स्प्रेस आहे की मालगाडी? हे त्या इंजिनावरील अक्षरांवरून तुम्हाला कळू शकते. चला तर मग आज आपण ते सोप्या भाषेत समजून घेऊ.

भारतीय रेल्वेच्या इंजिनांवर WAG, WAP, WDM, WAM अशी अक्षरे कोड स्वरूपात लिहिलेली असतात. त्यावरून समजतं की, ते विशिष्ट इंजिन किती वजन घेऊन जाऊ शकतं. या कोड्सच्या पहिल्या अक्षरातील ‘डब्ल्यू’ म्हणजे पाच फूट असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या गेजशी संबंध आहे. ‘A’ म्हणजे ऊर्जेचा स्रोत म्हणजे वीज. ‘डी’ असेल, तर त्याचा अर्थ ही रेल्वे डिझेलवर धावते. त्याचप्रमाणे इंजिनाचा उद्देश ‘P’, ‘G’, ‘M’ व ‘S’ या तिसऱ्या अक्षरांवरून समजतो. ‘पी’ म्हणजे पॅसेंजर ट्रेन, ‘जी’ म्हणजे गुड्स ट्रेन, ‘एम’ म्हणजे मिक्स कामासाठी व ‘एस’ म्हणजे ‘शंटिंग’.

(हे ही वाचा: काचेसारखे पारदर्शक ‘या’ तलावाचे पाणी; पण स्पर्शालाही बंदी! कारण काय…?)

इंजिनावरील WAG चा अर्थ काय?

जर तुम्ही ट्रेनच्या इंजिनावर ‘WAG’ लिहिलेले पाहिले असेल, तर तुम्हाला समजले पाहिजे की, ते वाइड गेज ट्रॅकवर चालते आणि एक AC मोटिव्ह पॉवर इंजिन आहे; ज्याचा वापर मालगाड्या ओढण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्याही इंजिनावर ‘WAP’ लिहिलेले आढळल्यास ते वाइड गेज ट्रॅक व एसी पॉवरवर चालते आणि प्रवासी गाड्या खेचते.

इंजिनावरील WAM चा अर्थ काय?

जर इंजिनवर ‘WAM’ लिहिलेले असेल, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की, ते वाइड गेज ट्रॅकवर चालते आणि ते एक AC मोटिव्ह पॉवर इंजिन आहे; जे प्रवासी आणि मालगाड्या दोन्ही खेचण्यासाठी वापरले जाते. कधी कधी तुम्हाला इंजिनावर ‘WAS’ असे लिहिलेले आढळू शकते. याचा अर्थ ते AC मोटिव्ह पॉवर इंजिन आहे आणि ते वाइड गेज ट्रॅकवर चालते. अशा इंजिनांचा वापर शंटिंगसाठी केला जातो.