Gandhi Jayanti 2023: महात्मा गांधी हे नाव माहिती नाही, असा देशात नव्हे जगात माणूस शोधून सापडणे अशक्य आहे. कारण- त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या तावडीतून देशाची सुटका करण्यासाठी मोलाचे कार्य पार पाडले. परंतु, या सर्व गोष्टी करताना त्यांच्यासमोर अनेक संकटे आली तरीही गांधीजींनी कधीही हार न मानता त्या संकटांचा सामना केला. त्यांनी जगाला अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गानेदेखील आपले हेतू साध्य करता येऊ शकतात हे पटवून दिले. त्यांच्या महान कार्यामुळे देशातील जनतेने त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली. लोक त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणू लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांधीजींनी केलेल्या कार्यासाठी जागतिक स्तरावर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. आपण प्रत्येक मोठ्या नेत्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आणि वाचत असतो; पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्या आपणाला माहिती नसतात. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला गांधीजींबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत; ज्या कदाचित तुम्ही याआधी ऐकल्या नसतील.

महात्मा गांधींबद्दलच्या काही महत्त्वाच्या आणि न ऐकलेल्या गोष्टी –

  • गांधीजींना सगळे महात्मा गांधी म्हणून ओळखत असले तरी त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी असे असून, त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.
  • गांधीजी केवळ १३ वर्षांचे असतानाच त्यांचा कस्तुरबा गांधी यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना चार अपत्ये झाली.
  • १८९३ मध्ये कायद्याची प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तेथे जवळपास २२ वर्षे तेथे राहिले. पीटरमॅरिट्झबर्ग येथे प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना त्यांना ट्रेनमधून ढकलून दिल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील अनेक वर्षांची विषमतावादी प्रथा मोडून काढण्यासाठी आणि वर्णभेद संपविण्याची मोहीम हाती घेतली.
  • १९१५ मध्ये गांधीजी भारतात परतल्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना कोणतेही राजकीय कार्य सुरू करण्यापूर्वी एक वर्षासाठी संपूर्ण भारताचा दौरा करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गांधीजींनी मुंबईतून सुरुवात करीत देशभर प्रवास केला. गांधीजींनी १९१७ मध्ये बिहारच्या चंपारण जिल्ह्यातून पहिले आंदोलन (सत्याग्रह) सुरू केले.

हेही वाचा- मुस्लीमबहुल देशाच्या चलनी नोटांवर आहे गणपती बाप्पाचा फोटो; जाणून घ्या रंजक कथा

  • गांधीजींनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ व भारत छोडो आंदोलनासह भारतातील विविध स्वातंत्र्य चळवळींचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील वसाहतवादी राजवटीविरुद्धच्या आंदोलनांमध्ये देशातील जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.
  • गांधीजी हे फक्त शाकाहारी आहार घ्यायचे. त्यांच्या शाकाहाराचा नैतिक आधार या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे की, त्यांनी आयुष्यभर केवळ ताज्या भाज्या, दही व फळे यांचे सेवन केले.
  • देशातील अस्पृश्यता दूर करण्यासाठी गांधीजींनी मोलाचे कार्य केले. १९३२ मध्ये त्यांनी अस्पृश्यांचे जीवन सुधारण्यासाठी एक मोहीम सुरू केली; ज्याला हरिजन असे नाव देण्यात आले. या शब्दाचा अर्थ ‘देवाची मुले’ असा होतो. गांधीजींनी ‘हरिजन’ हा शब्द ‘अस्पृश्य’ समाजासाठी शोधून काढला; जो अखिल भारतीय हरिजन दौऱ्यादरम्यान खूप लोकप्रिय झाला.

हेही वाचा- महिला आरक्षण प्रथम कुठे लागू झाले? महिलांच्या सहभागामुळे काय फरक पडला? जाणून घ्या सविस्तर! 

  • महात्मा गांधीजींनी भारतातील हातमाग उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याचे काम केले; त्यांनी खासकरून खादी उद्योगावर लक्ष केंद्रित केले.
  • अहिंसेचा संदेश देण्यासाठी गांधीजींना जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणूनही साजरा केला जातो.
  • १९३० मध्ये त्यांना टाइम मॅगझिनने ‘पर्सन ऑफ द इयर’ ही पदवी देऊन सन्मानित केले. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले.
मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhi jayanti 2023 how was gandhis life journey know the unheard things about them jap