Navi Peth In Pune : पेठा म्हणजे पुणेकरांचा पारंपरिक वारसा. प्रत्येक पेठेची एक स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळेच पेठेत राहणार्या पुणेकरांना त्याचा अभिमान वाटतो. सदाशिव पेठ, नारायण पेठ, नाना पेठ या पेठांना पेशव्यांच्या नावांचा संदर्भ आहे. पण, या सर्व पेठांव्यतिरिक्त एक अशी पेठ आहे; जी आपल्या नावासहित आपलं वेगळेपण टिकवून आहे आणि ती म्हणजे नवी पेठ!
या परिसराला ‘नवी पेठ’ हे नाव कसं पडलं? पुण्यात इतक्या पेठा असूनही ‘नवी पेठ’ची निर्मिती का करण्यात आली? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
पुण्यातील पेठा
अविनाश सोवनी यांच्या हरवलेले पुणे या पुस्तकात दिलेल्या संदर्भानुसार, साधारण १७२३ ते १८०३ या ८० वर्षांच्या कालखंडात पुण्यात कसबा पेठ वगळता, सोमवार ते रविवार पेठ अशा सात वारांच्या नावांच्या सात पेठा वसवल्या गेल्या. त्याचबरोबर व्यक्तिनामाने वसलेल्या नारायण, सदाशिव, घोरपडे व मुझफ्फरजंग या पेठा आणि देवतांच्या नावांनी वसलेल्या भवानी, गणेश, हनुमंत म्हणजे नाना पेठ, शिवपुरी म्हणजेच रास्ता पेठ, नागेश व नृसिंहपुरा या सहा पेठा आणि मीठ गंज किंवा गंज पेठ या नावाची एक पेठ, अशा एकूण १८ पेठांची वस्ती निर्माण करण्यात आली.
या परिसराला ‘नवी पेठ’ हे नाव कसं पडलं?
१९ व्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात पेशवाईच्या अस्तानंतर जवळजवळ ७०-८० वर्षांनी सदाशिव पेठेच्या बाजूला म्हणजे पर्वती पायथ्याच्या पलीकडे वस्ती वाढू लागली. पण, आपण जसं एखाद्या रस्त्याला नाव देताना विचार करतो किंवा प्रचंड आदरपूर्वक काहीतरी विचार करतो, तसं काही इंग्रजांना भारतात वाटलं नाही. त्यांच्या नव्या भागांनाही ते मेन स्ट्रीट, ईस्ट स्ट्रीट, सेंटर स्ट्रीट, अशी नावे ते देऊ लागले. या फक्त व्यवहारोपयोगी पद्धतीमुळे एक पेठ नव्याने वसली असून, त्या पेठेला नाव देण्याचे कोणीच मनावर घेतले नाही.
मग काय त्या काळच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे नवा तोफखाना, नवा पूल ही जशी नावे पडली तसेच या पेठेला नाव पडले ‘नवी पेठ’. तेव्हा अर्थात त्या १८ पेठा या जुन्या झाल्या होत्या म्हणून या पेठेला ‘नवी पेठ’ म्हणणे पुणेकरांनीही मोठ्या मनाने स्वीकारले.
नव्या पेठेचा परिसर वाढू लागला तेव्हा सदाशिव पेठ आणि नवी पेठ या दोन पेठांच्या मधल्या भागातली वस्ती कोणत्या पेठेतली, असा प्रश्न पडला. १९६२ ते ६५ या काळात हऊसिंग बोर्डाचे लोकमान्य नगर उभे राहिले. अशा बांधकामांमुळे हा परिसर त्यावेळी चांगला विकसित झालेला परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला. गेल्या ६०-७० वर्षांच्या कालावधीत ही नवी पेठ बहरली आणि तिने पुण्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.
© IE Online Media Services (P) Ltd