Speaker List of Rajyasabha : लोकसभेत पराभव, राज्यसभेत वर्णी आणि त्यापाठोपाठ मिळालेला मानाचा बंगला यानंतर आता त्यांच्यावर सोपवलेली महत्त्वाची जबाबदारी, त्यामुळे सुनेत्रा पवार यांची राजकीय कारकिर्द सुरू झाल्यापासूनच चांगलीच चर्चेत आहे. सुनेत्रा पवारांची आता राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. सुनील तटकरे यांनी यासंदर्भात एक्सद्वारे पोस्ट करून माहिती दिली. यामुळे सुनेत्रा पवारांची राज्यसभेतील पॉवर वाढणार का? तालिका अध्यक्ष म्हणजे काय? त्यांचे अधिकार काय? तालिका अध्यक्ष कसे निवडले जातात? याविषयी आपण जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तालिका अध्यक्ष म्हणजे काय?

विधानसभा आणि संसदेतील दोन्ही सभागृहात साधारण आठ तासांचं कामकाज चालणं अपेक्षित असतं. आता अर्थातच आठ तास अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचं कामकाज कसं चालणार असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा एक पॅनल तयार करण्यात आलं. या पॅनलवरचे अधिकारी म्हणजे तालिका पिठासीन अधिकारी. प्रत्येक पक्षाला या पॅनलमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते. ज्यांचे जास्त आमदार किंवा खासदार तितके त्यांचे जास्त पिठासीन अधिकारी असतात. म्हणजेच सत्ताधारी पक्षाचे सर्वाधिक पिठासीन अधिकारी असतात. पिठासीन अधिकारी म्हणजेच तालिका अध्यक्ष होय. विधानसभेत आणि लोकसभेत तालिका अध्यक्ष असतात तर विधान परिषद आणि राज्यसभेत तालिका सभापती असतात. तालिका अध्यक्षास कार्याध्यक्षही संबोधले जाते.

तालिका अध्यक्षांच्या जबाबदाऱ्या काय?

ज्यावेळी अध्यक्ष अनुपस्थित असतात तेव्हा त्यांच्या खुर्चीवर बसून सभागृहाचं कामकाज सुरळीत चालतंय का याची फक्त खातरजमा करण्याचा अधिकार तालिका अध्यक्षांना असतो. याव्यतिरिक्त वेगळे अधिकार, वेगळे हक्क तालिका अध्यक्षांना दिले जात नाहीत.

तालिका अध्यक्षांची निवड कशी होते?

एकपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या लोकप्रतिनिधीला तालिका अध्यक्षपद दिलं जातं. सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती ही नियुक्ती करतात. मात्र, सुनेत्रा पवार याला अपवाद ठरल्या आहेत. कारण, त्यांना पहिल्याच टर्ममध्ये तालिका अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunetra pawar appointed as talika adhyakshya speaker list of rajysabha what does mean sgk