Ice Cream Cone News: लहान मूल असो, तरुण असो किंवा म्हातारी माणसं आईस्क्रीम आवडत नाही असा माणूस जगात सापडणं तसं कठीणच. आईस्क्रीम त्याचे विविध फ्लेवर्स हे सगळ्यांनाच आवडतात. कपमधलं आईस्क्रीम, कोनमधलं आईस्क्रीम, पानावर किंवा डिशमध्ये तुकडे करुन देतात ते आईस्क्रीम असे आईस्क्रीमचे विविध प्रकार आपल्याला परिचित आहेत. आईस्क्रीमच्या कोनचा ( Ice Cream Cone ) शोध कसा लागला? हे तुम्हाला माहीत आहे का? हा शोध लागण्यामागे एक रंजक गोष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईस्क्रीम कोणत्या प्रकारात मिळतं?

कसाटा
कप आईस्क्रीम
कोन आईस्क्रीम ( Ice Cream Cone )
कुल्फी आईस्क्रीम
पानावारचं आईस्क्रीम
डिश आईस्क्रीम
बर्फाचं फ्लेवर्ड आईस्क्रीम (दुधाचा वापर न करता केलं)
मटका कुल्फी

हे पण वाचा- जगातील १०० प्रतिष्ठित आईस्क्रीमच्या यादीत ‘या’ पाच भारतीय आईस्क्रीमचा समावेश! तुम्ही कधी ते चाखले आहे का?

आईस्क्रीमचे अनेक फ्लेवर्स प्रसिद्ध

आईस्क्रीमचे हे प्रकार प्रचलित आहेत. तसंच मँगो, व्हॅनिला, चॉकलेट, चॉकलेट फज, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, पिस्ता, कोकोनट आईस्क्रीम, अमेरिकन ड्रायफ्रूट, मेलोजेलो, रासबेरी, पायनापल, ऑरेंज हे आणि असे अनंत फ्लेवर्सही खवय्यांना भुरळ घालत असतात. आईस्क्रीम घालून मिल्कशेक आणि मस्तानीही मिळते. ती देखील अनेकांच्या जिभेवर रेंगाळणारी चव सोडून जाणारी असते. तसंच बर्फाची फ्लेवर्ड कुल्फीही अनेकांना आवडते. व्हॅनिला आईस्क्रीम हा आईस्क्रीममधला विक्री होणारा लोकप्रिय प्रकार आहे. विविध कंपन्यांनी त्यांची आईस्क्रीम आणली आहेत. आता आपण जाणून घेऊ आईस्क्रीमच्या कोनमागची ( Ice Cream Cone ) रंजक गोष्ट आहे तरी काय?

काय आहे आईस्क्रीमच्या कोनच्या शोधाची गोष्ट?

चार्ल्स मेन्चेस नावाचा एक आईस्क्रीम विक्रेता डिशमधून आईस्क्रीम विकत होता. त्यावेळी त्याच्या दुकानात आईस्क्रीम खाण्यासाठी गर्दी झाली. ज्यानंतर त्याच्याकडे आईस्क्रीम तर होतं पण द्यायला डिश आणि कप संपले. आता काय करायचं असा प्रश्न त्याला पडला. त्यामुळे त्यामुळे त्याने अर्नेस्ट हॅमवी या जवळच्याच वॅफल विक्रेत्याला त्याची अडचण सांगितलं आणि तो म्हणाला मला असं काहीतरी बनवून दे ज्यात आईस्क्रीम देता येईल. अर्नेस्टने त्याचे वॅफल शंकूसारख्या आकारात बनवले, ज्यात चार्ल्स मेन्चेसनं आईस्क्रीम भरलं आणि ते लोकांना देण्यास सुरुवात केली. आईस्क्रीमसह त्याचा कोनही खाता येतो आहे म्हटल्यावर लोक आनंदी झाले. अशा रितीने या कोनमधल्या आईस्क्रीमचा जन्म झाला. अमेरिकेतल्या सेंट हुईस या शहरात जत्रेच्या दरम्यान हा प्रयोग झाला आणि आईस्क्रीमचा कोन जन्माला आला. जो आजही सगळ्यांच्या मनावर राज्य करतो आहे. http://www.seriouseats.com ने हे वृत्त दिलं आहे. या वेबसाईटने ही रंजक गोष्ट सांगितली आहे.

आईस्क्रीमच्या कोनचा शोध कसा लागला? काय आहे यामागची रंजक गोष्ट? (Photo-ANI)

कोनची संकल्पना प्रसिद्ध झाली

अमेरिकेतल्या जत्रेत कोनचा शोध लागला आहे. त्यामुळे पेपर डिश आणि कपमुळे होणारा टाकाऊ कचराही कमी झाला. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या आसपासच्या विक्रेत्यांनाही आईस्क्रीम कोनची ही नवी कल्पना आवडली आणि पुढे सर्वांनीच अशा पद्धतीने आईस्क्रीम विकण्यास सुरूवात झाली.आता या कोनच्या प्रकारांमध्ये मोठी क्रांती झालेली दिसून येते. चॉकलेट लावलेला कोन, विविध रंगीबेरंगी कोन, वॅफल कोन असे अनेक प्रकार प्रसिद्ध झाले आहेत. मूळात या कोनचा शोध एका गरजेतून लागला आहे हे मात्र तेवढंच खरं.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ice cream cone was invented in the early 1900 do you know the story behind it scj